हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू
By Admin | Published: November 6, 2016 02:23 AM2016-11-06T02:23:12+5:302016-11-06T02:23:12+5:30
पोलिसांवर वाढत्या कामाच्या ताणामुळे आणखी एका अवघ्या ४८ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.
मुंबई : पोलिसांवर वाढत्या कामाच्या ताणामुळे आणखी एका अवघ्या ४८ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. विष्णू रावजी कुंदे असे मृत पोलिसाचे नाव असून, त्यांच्यावर इगतपुरीजवळ नितावी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळचे नितावी गावचे रहिवासी असलेले कुंदे हे १९८९ साली मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत चांगली कामगिरी केलेल्या कुंदे यांची जून २०१२ रोजी भांडुप पोलीस ठाण्यात सहायक उप पोलीस निरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली. मनमिळावू आणि शांत स्वभावाचे असलेले कुंदे हे कल्याणमधील चक्की नाका परिसरात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी यांच्यासोबत राहत होते.
नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी शनिवारी पहाटे ५ वाजता ते झोपेतून उठले. आंघोळ करून सोफ्यावर बसलेले असतानाच कुंदे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना उपचारांसाठी पहिल्यांदा मेट्रो आणि त्यानंतर रुक्मिणी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सकाळी ६च्या सुमारास डॉक्टरांनी कुंदे यांना मृत घोषित केले. याची माहिती मिळताच भांडुप पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह कुंदे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. (प्रतिनिधी)