साहेबांची काळजी, शिपाई वाऱ्यावर
By admin | Published: December 9, 2014 12:53 AM2014-12-09T00:53:10+5:302014-12-09T00:53:10+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेल्या पोलिसांना व्यवस्था पुरविताना दुजाभाव केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशन : पीआयना शुद्ध पाणी, शिपायांचे टाकीला तोंड
राजेश निस्ताने - यवतमाळ
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेल्या पोलिसांना व्यवस्था पुरविताना दुजाभाव केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच वेळी शिपाई-जमादारांना थेट टाकीच्या नळान्ला तोंड लावून पाणी प्यावे लागत आहे.
खाकी वर्दीतील पोलीस हा माणूसच. मात्र सरकार त्या माणसांमध्येही दुजाभाव करताना दिसते. पोलिसांना हुद्यानुसार वेतन, भत्ते, सोईसुविधा मिळतात. परंतु सार्वजनिक ठिकाणीसुद्धा ही सापत्न वागणूक कायम असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नागपुरात अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे १० हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी आले आहेत. त्यात पोलीस अधिकाऱ्यांची संख्या कमी आणि कर्मचाऱ्यांची अधिक आहे. म्हणून त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी निवास, खानपानाची व्यवस्था केली गेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी टाकी उपलब्ध करून दिली. तेथे ग्लासचीही व्यवस्था नाही.
थेट टाकीच्या नळाला तोंड लावून पाणी प्यावे लागत आहे तर दुसरीकडे अधिकाऱ्यांसाठी खास शुद्ध पाण्याच्या कॅन बोलविण्यात आल्या आहेत. बरेच आजार दूषित पाण्यामुळे होतात. बंदोबस्ताला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे आरोग्य बिघडू नये म्हणून त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले. ते पाहता थेट नळाचे पाणी पिणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साहेब आणि शिपायामध्ये फरक दाखविणारी अशीच व्यवस्था अन्य बाबतीतही पहायला मिळते. अशाच व्यवस्थेने अखेर थंडीत एका पोलीस जमादाराचा बळी गेला.
पोलीस दलातील हा भेदभाव नेहमीच अधोरेखीत होतो. पोलीस कर्मचाऱ्यांना साध्या दोन खोल्यांच्या क्वॉर्टरसाठी वर्षोगणती प्रतीक्षा यादीत राहावे लागते. तर दुसरीकडे आयपीएस अधिकाऱ्याला किमान एकरभर जागेतील भलामोठा बंगला, खाकी वर्दीतील नोकर-चाकर, स्वत:सह परिवारासाठी दोन ते तीन वाहने उपलब्ध करून दिली जातात. हा असमतोल सरकारी कृपेनेच कायम ठेवला जात आहे. त्यामुळे आम्ही माणसे नाहीत काय, आम्हाला आरोग्य नाही काय, असा जाब पोलीस शिपायांमधून विचारला जात आहे.