काळजी मराठवाड्याची
By admin | Published: September 18, 2016 03:21 AM2016-09-18T03:21:46+5:302016-09-18T03:21:46+5:30
लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या भाषणातून औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आला.
लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या भाषणातून औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आला. औरंगाबाद ते पैठण या ४५ किलोमीटर रस्त्याच्या दुर्दशेची कहाणी मुंबईत आयोजित ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी समोर आणली. पैठण ही संतांची भूमी, राज्यातील सर्वांत मोठे जायकवाडी धरण या ठिकाणी आहे. मात्र, ४५ कि.मी.चे अंतर कापायला दीड तास लागतो. आपल्या पायाभूत सुविधा किती कमकुवत आहेत, याचे हे उदाहरण आहे. लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह सुरू होण्यापूर्वी केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, औरंगाबाद ते पैठण रस्त्याला जरी महामार्गाचा दर्जा देण्यात आला असला तरी कन्सल्टन्ट नियुक्तीची फाईल ३ महिन्यांपासून दिल्लीत प्रलंबित आहे. ना. नितीन गडकरी यांनी तातडीने या विषयात लक्ष घालू आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिले. पायाभूत सुविधा आणि विकास ही रथाची दोन चाके आहेत. पायाभूत सुविधा असल्या की विकास कसा होतो, हे आम्ही जवळून पाहिले आहे. ते पुढे म्हणाले की, औरंगाबाद - जालना मार्ग गेल्या काही वर्षांपासून चांगला तयार केला आहे. त्यामुळे या मार्गावर समृद्धी दिसते. मात्र, दुसऱ्या बाजूला औरंगाबाद-पैठण मार्गावर बिडकीन येथे दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरसाठी (डीएमआयसी) ८,५०० एकरांपेक्षा जास्त जमीन संपादित केली आहे. या जमिनीचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, औरंगाबाद ते बिडकीन हे अवघ्या २३ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी एक तास लागत असेल, तर भविष्यात ही औद्योगिक वसाहत विकसित होईल तरी कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विचारांशी मी सहमत आहे, लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले.