करिअर ब्रेकचा ‘नवअवतार’!
By admin | Published: March 8, 2016 02:44 AM2016-03-08T02:44:28+5:302016-03-08T09:39:19+5:30
काही कारणांमुळे करिअरवर पाणी सोडावे लागलेल्या महिलांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. सौंदर्या राजेश काम करत आहेत
स्नेहा मोरे, मुंबई
काही कारणांमुळे करिअरवर पाणी सोडावे लागलेल्या महिलांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. सौंदर्या राजेश काम करत आहेत. ‘अवतार-आय विन’ कंपनीच्या माध्यमातून इतर कंपन्यांशी संपर्क साधून, ‘ब्रेक’ घेतलेल्या महिलांना नव्याने करिअर सुरू करण्याची संधी देत आहेत. आतापर्यंत त्यांच्या कंपनीने ८ हजार महिलांना पुन्हा नोकरी करण्याच्या संधी मिळवून दिल्या आहेत.
केवळ महिलांसाठीच नोकरी उपलब्ध करून देणारी ही पहिली संस्था असून, डिसेंबर २००५ साली तिची स्थापना झाली. ‘अवतार - आय विन’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ‘फ्लेक्झी करिअर’ ही संकल्पना राबविली जात आहे. कंपनीच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलून ही संकल्पना मांडण्यात आली. त्यापैकी ९० टक्के कंपन्यांना ती आवडली.
सौंदर्या मूळच्या चेन्नईच्या. इंग्रजी लिटरेचरच्या पदवीनंतर त्यांनी एमबीए केले. सिटी बँकेत नोकरी केली. विवाहानंतर १९९३ ते ११९६ या कालावधीत ब्रेक घेतला. नंतर पुन्हा काम सुरू केले. विविध महाविद्यालयांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून जाऊ लागल्या. नोकरीसाठी कंपन्यांच्या पायऱ्या झिजवताना विविध अनुभव आले आणि त्यातूनच या कंपनीचा उदय झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या प्रवासात पुणे, मुंबई, कोल्हापूर केंद्रांसाठी झालेल्या मुलाखतीदरम्यान कोल्हापूरमधून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले. ग्रॅज्युएट महिलांनी अर्ज करणे
अपेक्षित होते. मात्र, दहावी,
बारावी झालेल्यांनीही मोठा प्रतिसाद दिला.
नोकरीच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या कंपनीत संधी आहेत, हे शोधणे गरजेचे असते. कंपनीला कसे कर्मचारी हवे आहेत, याचा विचार करून प्रेझेंटेशन केले पाहिजे. अनुभव, शिक्षण, कौशल्ये, क्षमता मेळ घातला पाहिजे. ब्रेकनंतर पगार आणि दर्जाशी करावी लागणारी तडजोड, समुपदेशन या सर्व टप्प्यांवर कंपनी साहाय्य करते.
अमेरिकेतील शिष्यवृत्ती
२००५मध्ये अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासामार्फत मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अमेरिकेला जाण्याची संधी सौंदर्या यांना मिळाली. मात्र, तिथेही नोकरदार महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांना जाणवले. अमेरिकेतून परतल्यावर त्यांनी २५ कॉर्पोरेट्स कंपन्यांतील करिअरमधून ब्रेक घेतलेल्या महिलांशी संवाद साधला.
देशातील ४८ टक्के महिला आपले करिअर अर्ध्यावरच सोडत असल्याचे निदर्शनास आले, तर जगभरात २३ टक्के महिलांनी करिअरमध्ये ब्रेक घेतल्याचे त्यांना आढळले. सासरच्यांचा नोकरीला विरोध, बाळंतपण, नवऱ्याची बदली, स्वत:चे आजारपण, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास आणि घर-नोकरीचा असह्य ताण, यामुळे महिला ब्रेक घेत असल्याचे दिसून आले.