करिअर मंत्र : स्वत:च्या मानसिकतेवरून करिअर निवडा

By Admin | Published: February 5, 2017 01:04 AM2017-02-05T01:04:57+5:302017-02-05T01:04:57+5:30

करिअरची उजळणी : करिअरला नवीन दिशा द्यायची असेल तर आता थोडी करिअरची उजळणी करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा वयाप्रमाणे आपल्या कौशल्यांचे प्राधान्यसुद्धा बदलले पाहिजे.

Career Mantra: Choose a career from your own mentality | करिअर मंत्र : स्वत:च्या मानसिकतेवरून करिअर निवडा

करिअर मंत्र : स्वत:च्या मानसिकतेवरून करिअर निवडा

googlenewsNext

- शिवांगी झरकर

करिअरची उजळणी : करिअरला नवीन दिशा द्यायची असेल तर आता थोडी करिअरची उजळणी करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा वयाप्रमाणे आपल्या कौशल्यांचे प्राधान्यसुद्धा बदलले पाहिजे. उदा.- वयाच्या १५-१६ वर्षांपर्यंत प्राधान्य हे नेहमी अध्ययन, शिकणे आणि शिक्षणाला द्यावे. वयाच्या १७ ते २५ वर्षांपर्यंत प्राधान्य नेहमी तांत्रिक शिक्षणाला आणि विशेषीकरणाला द्यावे. वयाच्या २५ वर्षापासून पुढे प्राधान्य नेहमी व्यावहारिक आणि आर्थिक शिक्षणाला द्यावे.

महत्त्वाचे टप्पे
करिअर बनण्यामध्ये काही महत्त्वाचे टप्पे असतात, ते पुढीलप्रमाणे आहेत :-
आवड + निवड + इच्छा + दिशा + तीव्र भावना + युक्ती + विचार + गुण
वरील सर्व बाबी मिळून बनते तुमचे करिअर. जर करिअरमध्ये आवडीसोबत योग्य निवडीची मदत असेल, तर ते १०० टक्के योग्य असते आणि त्यात हमखास यश मिळते. जर आपण चाकोरीबाहेर विचार करून नावीन्यपूर्ण करिअरचा विचार करत असू तर आधी स्वत:च्या करिअर योजनेची चौकट परिपूर्ण करणे आवश्यक असते. परंतु बहुतेक वेळा विद्यार्थी आवडीवर भर देऊन किंवा व्यवहाराला बळी पडून करिअर निवडतात आणि योजनेच्या अभावी एक तर अपयशी होतात किंवा ताणाने निराश होतात. म्हणून विचार करा - योजना बनवा - कृती करा.
मानसिकतेचे गणित
करिअरला वेग द्यायचा असेल तर मानसिकतेचे गणित जाणणे गरजेचे आहे. करिअर बनण्यासाठी व्यक्तिमत्त्वासोबत अनुरूप मानसिकता असणे आवश्यक आहे.
व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल बरेच लेख, पुस्तके, सीडीज आणि इतर साहित्य बाजारात उपलब्ध आहेत, पण मानसिकता दर्शवणारे किंवा मानसिकतेवरून करिअर कसे निवडावे हे कुठेही दर्शवलेले नाही. परंतु आपण आज शिकणार आहोत की मानसिकता कशी असते आणि त्याचा फायदा काय?
तुमची मानसिकता ही तुमच्या मनाचे आणि स्वभावाचे प्रतिबिंब असते. त्यामुळे जे भाव तुमच्या मनात येतात, तेच तुमच्या कामात आणि कृतीत दिसतात. म्हणून जरी तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असले तरी बिना मानसिकतेच्या चाकाशिवाय करिअरचे पर्व सुरू होऊ शकत नाही.
मानसिकतेचे टप्पे : सकारात्मक, नकारात्मक, संशयी, स्थिर, चाकोरीबाहेर
करिअर यशस्वी कसे करायचे?
कोणत्याही करिअरच्या दोन बाजू असतात... एक आंतरिक आणि दुसरी बाह्य. बाह्य बाजू ज्याला आपण नेहमी जपतो किंवा बघतो, त्यात तुमचे शिक्षण, कौशल्य, व्यवहार, आर्थिक बाबी, यश आणि अपयश येतात आणि आंतरिक बाजू म्हणजे तुमचा स्वभाव, गुण आणि मानसिकता या बाबी येतात. म्हणून जे संस्कार तुम्ही तुमच्यावर किंबहुना मनावर करता ते कायम तुमच्या सोबत राहतात. जर अतूट आणि यशस्वी करिअरसाठी मानसिकतेची जोड घेणे आवश्यक आहे.
मानसिकतेची चौकट :
करिअरसाठी ज्या मानसिकता लागतात त्याला करिअर मानसिकता म्हणतात. त्यात मानसिकतेची चौकट येते. ही मानसिकता ४ मुख्य भागांत विभागली आहे. त्याचे गुण, फायदे, करिअर आणि स्वभाव कसे पूरक होतील ते आपण बघूच.
ते भाग पुढीलप्रमाणे आहेत.
शेतकरी मानसिकता, शिकारी मानसिकता, दुरुस्त करणारी मानसिकता, दुकानदार मानसिकता
शेतकरी मानसिकता :
यामध्ये तुमची मानसिकता ही कला, कौशल्य, सर्जनशीलता, कल्पकता, रेखीवता अशा गोष्टींशी निगडित असते. तुम्ही नेहमी सकारात्मक आणि कल्पक विचार करता आणि नावीन्यपूर्ण गोष्टी कल्पनेतून वास्तवात उतरवायचा प्रयत्न करता. जसा शेतकरी खूप मेहनत करून पिकांची लागवड करतो त्याचप्रमाणे या मानसिकतेची लोकं नावीन्यपूर्ण गोष्टी जन्माला घालतात. यांचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असतो. यामध्ये बहुदा, लेखक, अभिनेता, चित्रकार, सुतार, आर्किटेक्ट, डिझायनर अशा व्यक्तींचा समावेश असतो.
शिकारी मानसिकता :
या मानसिकतेमध्ये वेग आहे, स्फुरण आहे, जलदता आहे आणि मुख्य म्हणजे लक्ष्यभेदन करण्यासाठी वेळेचे नियोजन आहे. ही मंडळी थोडी रागीट, स्पर्धात्मक असतात. त्याचसोबत परिणामकारक आणि प्रभावित करणारी असतात. आकर्षित करणे आणि प्रेरणा देणे या लोकांना फार चांगले जमते. या मानसिकतेत बहुदा
पुढारी, पोलीस, आर्मी, संरक्षक, शिकारी,
वन अधिकारी, खेळाडू या व्यक्ती
येतात.
दुरुस्ती करणारी मानसिकता :
या मानसिकतेमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये बिघडलेल्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्याची सवय असते. तर्क काढणे, वैचारिक चर्चा करणे, निरीक्षण करणे, अनुमान ठरवणे, संशोधन करणे या सर्व गोष्टींचा समावेश या मानसिकतेच्या लोकांमध्ये असतो. या प्रकारच्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीचा दोन्ही बाजूंनी विचार करून निष्कर्ष काढतात म्हणून यांना निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. यामध्ये डॉक्टर, वकील, संशोधक, आय.ए.एस. अधिकारी, विश्लेशक, इंजिनीअर व इतर सर्व प्रकारचे तंत्रज्ञ व्यक्ती येतात.
दुकानदार मानसिकता :
या मानसिकतेमध्ये फक्त येते ‘देणे आणि घेणे’. या व्यक्ती स्थिरतेला जास्त प्राधान्य देतात. ते स्व:तहून नवीन संधी शोधत नाहीत. त्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्यांना एकत्र करून काम करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कधी कधी स्वत:चा फायदा, आराम, नफा या गोष्टींचा पडताळासुद्धा केला जातो. म्हणून या मानसिकतेमध्ये जास्तकरून दुकानदार, लिपिक, लेखापाल (अकाउंटंट) अशा लोकांचा समावेश होतो.
मानसिकतेची चौकट कशी पडताळायची?
आपल्या मूळ स्वभावाशी कोणती मानसिकता जुळते आहे ते बघा. जर तुम्हाला वाटते एखाद्या विषयावर प्रभुत्व हवे तर तुम्हाला कोणत्याही तीन प्रकारच्या मानसिकतेचा त्रिकोण पूर्ण करावा लागेल. उदा.- जर तुम्हाला डॉक्टर व्हायचे आहे तर मुख्य गरज आहे दुरुस्ती करणाऱ्या मानसिकतेची. नंतर त्यात अजून प्रभुत्व हवे तर पुढे त्याचे दोन भाग पडतील.
१) सर्जन डॉक्टर :
सर्जन डॉक्टरांना निर्णय जलद घ्यायचे असतात, त्याचसोबत त्यांना सर्जरी (शस्त्रक्रियेत) कौशल्यसुद्धा दाखवायचे असते, त्यामुळे त्यांचा त्रिकोण आहे. उदा.- शेतकरी मानसिकता - शिकारी मानसिकता - दुरुस्ती करणारी मानसिकता
२) फिजिशीयन :
फिजिशीयन डॉक्टरांना निर्णय हा हळूहळू विचार करून, औषधांचे दुष्परिणाम बघून घ्यावे लागतात. त्याचसोबत त्यांचे संपूर्ण काम बैठे असते. म्हणून त्यांचा त्रिकोण खालीलप्रमाणे आहे. उदा.- दुरुस्ती करणारी मानसिकता - दुकानदार मानसिकता - शेतकरी मानसिकता.
अशाप्रकारे तुम्ही कोणतेही करिअर त्याच्या लागणाऱ्या मानसिकतेवर पडताळून बघू शकता आणि ज्या मानसिकतेची कमी आहे, त्या मानसिकतेला स्वत:मध्ये अमलात आणू शकता.

 

Web Title: Career Mantra: Choose a career from your own mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.