वयोवृद्ध लीला परुळेकरांच्या प्रकृतीची हेळसांड
By admin | Published: May 13, 2016 03:45 AM2016-05-13T03:45:16+5:302016-05-13T03:45:16+5:30
‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकरांच्या कन्या आणि प्राणिमित्र लीला परुळेकर यांची वयाच्या ८०व्या वर्षी प्रचंड अवहेलना होत आहे.
मुंबई : ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकरांच्या कन्या आणि प्राणिमित्र लीला परुळेकर यांची वयाच्या ८०व्या वर्षी प्रचंड अवहेलना होत आहे. लीला परुळेकरांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेल्या ट्रस्टकडून त्यांची योग्य निगा राखली जात नसून या वयात त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप लीला परुळेकरांना गुरुस्थानी मानणारे प्राणिमित्र मनोज ओसवाल यांनी केला.
लीला परुळेकरांच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यासाठी गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ओसवाल यांनी विविध छायाचित्रे आणि पुराव्यानिशी वृद्धावस्थेतील लीला परुळेकरांच्या देखभालीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला. दै. ‘सकाळ’चे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर यांच्या कन्या लीला परुळेकर यांच्या नावे पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आहे. यात पुणे रेल्वे स्थानकालगतची ३.३ एकर जागा, बाणेर येथील २ फ्लॅट, महाबळेश्वर येथील ७ एकर जागेचा समावेश आहे. शिवाय विविध योजनांमध्ये १५ कोटींची गुंतवणूक आणि बँकेत ५ कोटींच्या मुदत ठेवी आहेत.
या संपत्तीच्या मोहापायी वृद्धावस्थेतील लीला परुळेकरांचा छळ आणि फसवणूक होऊ नये. तसेच त्यांना विस्मृतीचा आजार जडल्याने त्यांची योग्य देखभाल व्हावी म्हणून २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने चार सदस्यांचा ट्रस्ट बनविण्यात आला. यात निवृत्त न्यायधीश जे. ए. पाटील, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, निवृत्त सरकारी अधिकारी सुनंदा कौशिक आणि जिल्हा न्यायालय व्यवस्थापक अतुल झेंडे यांचा समावेश करण्यात आला. लीला परुळेकर आणि त्यांच्या २०० कुत्र्यांची देखभाल आणि निगा राखण्यासाठी स्थापलेल्या या ट्रस्टने जाणीवपूर्वक परुळेकरांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप ओसवाल यांनी केला.
या ट्रस्टने परुळेकरांची संपत्ती आणि मालमत्तेच्या रक्षणात विशेष रस दाखविला. त्यांच्या मालमत्तेवर अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेतली. मात्र, हे करताना लीला परुळेकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. प्राणिमित्र आणि याचिकाकर्ते ओसवाल यांनी वारंवार ही बाब ट्रस्टच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लीला परुळेकरांना सध्या ज्या सुविधा मिळतात त्या पुरेशा असल्याचा हेका ट्रस्टने धरल्याचे ओसवाल यांनी सांगितले.
परुळेकरांच्या घरात सुमारे २०० कुत्रे आहेत. या कुत्र्यांचीही देखभाल, व्यवस्था केली जात नाही. परुळेकरांचे घर आणि परिसरातच हे कुत्रे नैसर्गिक विधी करतात. याचा बंदोबस्त न केल्याने दुर्गंधी पसरल्याचा आरोप ओसवाल यांनी केला. आयुष्यभर प्राण्यांसाठी झटणाऱ्या परुळेकरांची उतारवयात हेळसांड होत आहे.
त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता
यावे यासाठी सामाजिक संघटना, प्राणिप्रेमी संघटनांनी पुढाकार
घ्यावा, असे आवाहनही ओसवाल यांनी केले. (प्रतिनिधी)