काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन; आमदारांच्या भेटीही टाळल्या
By अजित मांडके | Published: December 2, 2024 03:53 PM2024-12-02T15:53:00+5:302024-12-02T15:53:47+5:30
मागील दोन दिवस एकनाथ शिंदे आरामासाठी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळगावी गेले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ते ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
ठाणे : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा न झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते ठाण्यातील शुभदिप या बंगल्यावर आराम करीत आहेत. ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या आमदारांना त्यांच्याबरोबर चर्चा न करताच परतावे लागले.
मागील दोन दिवस ते आरामासाठी आपल्या दरे येथील गावी गेले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ते ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदाबरोबरच इतर पदांसाठी रस्सी खेच सुरु झाली आहे. त्यातही शिंदे सेनेला गृहमंत्री पद मिळावे यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. परंतु असे असतांना आता शिंदे हे आजारी पडल्याने त्यांच्या आमदारांबरोबर होणाऱ्या चर्चांना सध्या पूर्णविराम लागला आहे.
त्यांच्या डॉक्टरांकडून रक्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर त्यांना थ्रोट इन्फेक्शन आणि अंगात ताप असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. प्रकृतीत सुधारणा होत नाही तोपर्यंत डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असल्याचेही त्यांनी निकटवर्तींनी सांगितले.
दरम्यान सोमवारी त्यांची पक्षातील आमदारांबरोबर बैठक होती, असे बोलले जात होते. परंतु तशा स्वरुपाच्या कोणत्याही बैठका नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे त्यांच्या भेटीसाठी आमदार विजय शिवतारे आणि अर्जुन खोपकर आले होते. परंतु डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असल्याने या दोघांनीही त्यांची भेट मिळाली नाही. हे दोघे श्रीकांत शिंदे यांना भेटून परत निघाले. परंतु आमदारांच्या बैठकीबाबत कल्पना नाही. तसेच आमदारांची कोणत्याही स्वरुपाची बैठक नसल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्र्यांना ओळखत नाही का?
एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी विजय शिवतारे हे ठाण्यातील निवासस्थानी आले असता, बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांची गाडी अडविली. यावेळी शिवतारे यांनी आमदार आणि माजी मंत्र्यांना तुम्ही ओळखत नाही का? किती वर्षे झाले. तुम्हाला हे माहित नाही का? अशी त्यांची आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक झाली.
उपमुख्यमंत्री पदाबाबत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोडले मौन
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्याने सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे प्रकती अस्वास्थामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. मात्र त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या देखील मागील दोन दिवस फिरत आहेत.
वस्तुत: यात कोणतेही तत्थ नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व अफवा निराधार असल्याचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या एक्स अकांऊटवरुन स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्रात मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करुन मी तेव्हाही मंत्रीपदाचा नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो असेही ते म्हणाले आहे. माझा लोकसभा मतदार संघ आणि शिवसेना पक्षासाठीच नेटाने काम करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे माध्या संदर्भातील चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा त्यांनी या माध्यमातून व्यक्त केली आहे.