उम्रद येथे पूरात वाहून युवकाचा मृत्यू
By admin | Published: July 15, 2016 05:03 PM2016-07-15T17:03:09+5:302016-07-15T17:03:09+5:30
तालुक्यातील उम्रद येथील दमणगंगा नदीपात्रात पूरात वाहून गेल्याने एका तीस वार्षिय युवकाचा मृत्यू झाला
ऑनलाइन लोकमत
पेठ, दि. 15 - तालुक्यातील उम्रद येथील दमणगंगा नदीपात्रात पूरात वाहून गेल्याने एका तीस वार्षिय युवकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उम्रद येथील सदू पांडू भूसारे वय- 30 हा पेठहून बाजार करून घराकडे जात असतांना दमणगंगा नदीवरील पूलावरून पाण्यातून वाट काढीत जात असतांना पूलाचे कठडे पुरामूळे वाहून अंदाज न आल्याने पाय घसरून पूरात वाहून गेला. सायंकाळ पर्यंत सदू घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा रात्रभर कोठेही तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी नजिकच्या बोंडारमाळ गावाजवळ नदीकाठी भूसारे याचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. पेठ पोलिसांना खबर दिल्याने पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. पेठच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उम्रद येथील स्मशान भूमीत सदू भूसारे यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरच्या पुलाचे संरक्षक कठडे पहिल्याच पूरात वाहून गेल्याने या पूलावरून पावसाळ्यात पूराचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून या पूलावरून ये जा करावी लागत असल्याने संबंधित विभागाने या पूलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे (वार्ताहर)