पिंपरी चिंचवडमध्ये सेनेला धक्का,गजानन बाबर भाजपात
By admin | Published: January 18, 2017 04:49 PM2017-01-18T16:49:56+5:302017-01-18T17:17:14+5:30
माजी खासदार गजानन बाबर शिवसेनेत जाणार की भाजपात या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बाबर यांनी भाजपात प्रवेश केला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - माजी खासदार गजानन बाबर शिवसेनेत जाणार की भाजपात या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बाबर यांनी भाजपात प्रवेश केला. बाबर यांच्या शिवसेना, मनसे मार्गे भाजपातील उडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शिवसेनेत असताना गजानन बाबर यांना पिंपरी महापालिकेत तीन वेळेस नगरसेवक म्हणून संधी मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे दोन वेळेस हवेली विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी खासदार झाले.
2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना खासदारकीच्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेली अंतर्गत मदतीची परतफेड करण्याच्या उद्देशाने उमेदवारी मागितली होती. मात्र, बाबर यांचा कावेबाजपणा शिवसेनाप्रमुखाच्या लक्षात आल्याने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली होती.
त्यावेळी बाबर यांनी पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पैसे देऊन उमेदवारी दिली असा आरोप केला होता. त्यानंतर पूर्वनियोजित पणे आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठींबा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह मनसेत जाहीर प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना मदत केली होती, मात्र जगताप यांचा दीड लाखाच्या फरकाने पराभव झाला होता.
त्यानंतर बाबर यांनी शिवसेनेत प्रवेशासाठी प्रयत्न केला होता. दोन वर्ष शांत राहिले होते. त्यांनी शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला होता. विद्यानगर पोटनिवडणुकीत ते शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बाहेर पडले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या विरोधामुळे बाबर यांना शिवसेनेत प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर महापालिकेची निवडणूक जाहिर झाल्यानंतरही ते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती.
मात्र, त्यांनी बुधवारी दुपारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार लक्ष्मण जगताप, सूरज बाबर उपस्थित होते.