कर्नाटक पोलिसांचा सातारा जिल्ह्यात गोळीबार !
By admin | Published: May 25, 2016 11:57 AM2016-05-25T11:57:33+5:302016-05-25T11:57:51+5:30
मंगळवेढा येथील तीन आरोपींना पकडण्यासाठी कर्नाटकचे पोलिस साता-यात येऊन पोहोचले.
Next
मंगळवेढ्याच्या आरोपींना पकडण्यासाठी पाठलागाचा थरार; स्थानिक पोलिस मात्र अनभिज्ञ
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २५ - स्थळ : वाठार स्टेशनचा चौक. वेळ : सकाळची. लोकांची लगबग सुरू झालेली... एवढ्यात मोटारसायकलवरून तिघेजण चौकात येताच पाठीमागून भरधाव वेगात पोलिसांची गाडी कचकन त्यांच्यासमोर उभी ठाकते. गाडीतून पोलिस उतरेपर्यंत मोटारसायकलवरील दोघे जण पळून जातात. एकाला पकडण्यासाठी पोलिस त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार करतात. अखेर एकजण त्यांच्या तावडीत सापडतो... त्याला घेऊन ते 'गोल टोपीवाले' पोलिस निघून जातात. ग्रामस्थ मात्र पुरते हबकतात. विशेष म्हणजे ज्या गावात ही फिल्मी स्टाईल घटना घडली, तिथल्या स्थानिक पोलिसांना याचा थांगपत्ताही नसतो. कारण गोळीबार करणारे हे पोलिस कर्नाटकचे असतात.
मंगळवेढा येथील तीन आरोपींना पकडण्यासाठी कर्नाटकचे पोलिस काल रात्रीपासून त्यांच्या पाठलागावर होते. आरोपी मोटारसायकलवर तर पोलिस त्यांच्या गाडीत... असा हा थरारक प्रवास फलटणमार्गे वाठार स्टेशनमध्ये आज सकाळी पोहोचला. कर्नाटकच्या पोलिसांनी गोळीबार करून एकाला ताब्यात घेतले असले तर बाकीचे दोघे फरार झाले.
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात आज सकाळी ही घडल्यानंतर पोलिस खंडाळ्याच्या दिशेने घाटात निघून गेले. मात्र हे आरोपी गावातच कुठेतरी लपून बसल्याची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील स्थानिक पोलिस यंत्रणा कामाला लागली असून खंडाळा तालुक्यात पोहोचलेल्या कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.