कुलभूषण जाधवांच्या कर्मभूमीत पेढे वाटून आनंदोत्सव
By admin | Published: May 18, 2017 05:25 PM2017-05-18T17:25:13+5:302017-05-18T20:15:59+5:30
हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली.
Next
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 18 - हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाचं देशभरातून स्वागत करण्यात येत आहे. हे वृत्त कुलभूषण जाधव यांची कर्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील आनेवाडीत येऊन धडकताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंचायत समिती सदस्या जयश्री गिरी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत निर्णयाचे स्वागत केले. सकाळपासून टीव्हीसमोर बसलेल्या ग्रामस्थांकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
भारत सरकारने कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून द्यावा, त्यांची सुटका करण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी आनेवाडी ग्रामस्थांनी सरकारकडे वारंवार केली होती. त्यांच्या सुटकेसाठी आनेवाडीकरांनी देवाकडे धावा केला होता. त्या प्रार्थनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.
प्रसार माध्यमातून कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याचे वृत्त समजताच पंचायत समिती सदस्या जयश्री गिरी, सरपंच अश्विनी शिंदे यांच्यासह आनेवाडी ग्रामस्थ तालुक्याच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. त्यांनी ह्पाकिस्तान मुदार्बाद...घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली.
भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल सुनावला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने, “महाराष्ट्राचे नागरिक कुलभूषण जाधव हे हेर असल्याच्या पाकिस्तानच्या म्हणण्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना अंतिम निर्णयापर्यंत फाशी दिली जाऊ नये”, असं ठणकावून सांगितलं. इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला. कोर्टाच्या या निर्णयानंतर आनेवाडी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला असून भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे.
भारतासाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत, भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.