दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकनंतर राज्यात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:32 AM2019-02-27T05:32:13+5:302019-02-27T05:32:25+5:30

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर हल्ले करून ते नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. गावोगावी पेढे वाटून, रॅली काढून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. भारतीय सैन्यदलाप्रति नागरिकांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. महानगरांमध्ये देशभक्ती गीतांचे गायन तसेच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते. नाशिकला वीरपत्नींनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेतील मुलांपासून ते महिला, ज्येष्ठ नागरिक या जल्लोषात सहभागी झाले होते.

Carnival in the state after second surgical strike | दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकनंतर राज्यात आनंदोत्सव

दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकनंतर राज्यात आनंदोत्सव

Next

मुंबई/ठाणे/नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नागरिकांचा ‘हाय जोश’ पाहायला मिळाला. मुंबईत रेल्वे स्थानक परिसरात मिठाई वाटण्यात आली. संध्याकाळी अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबईत विविध पक्ष आणि संघटनांनी रॅली काढून जल्लोष केला. मुंब्रा येथे बाबा फकरूद्दीन शाह दर्ग्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिमांनी जवानांसाठी दुवा करत दर्ग्यात तिरंगा फडकवला.


कोकणात आनंदोत्सव
रायगड जिल्ह्यात रोहा येथे शिवसैनिकांनी फटाके फोडले. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, राजापुरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राजापुरात नागरिकांनी दुचाकी रॅलीही काढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात नागरिक एकत्र आले होते.


बुलडाण्यात कारवाईबद्दल समाधान
पुलवामा हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. संपूर्ण जिल्हा शोकसागरात होता. मंगळवारच्या कारवाईनंतर सर्वांनी समाधान व्यक्त केले. चिखली येथे भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शहीद जवान नितीन राठोड यांच्या चोरपांग्रा (गोवर्धननगर) गावी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करत फटाके फोडण्यात आले. वाशिम जिल्ह्यातही फटाके फोडण्यात आले.
खान्देशात जल्लोष
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नागरिकांनी जल्लोष केला. धुळ्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले. नंदुरबारमध्ये तिरंगा हातात घेऊन जल्लोष करण्यात आला. जळगाव विविध संस्था, युवकांनी वेगवेगळ्या चौकात जमा होऊन फटाके फोडले़

राज्यात अ‍ॅलर्ट
पुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी वायूसेनेने बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त केला. हवाई हल्ल्यानंतर सतर्कता म्हणून राज्यातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार, मंगळवारीच याबाबत सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. बालाकोट येथील जैश ए मोहम्मद ही संघटना भारताच्या विविध भागांत हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर आली. त्यात आजच्या प्रतिउत्तरानंतर, सुरक्षा यंत्रणांना अ‍ॅलर्ट राहण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने मंगळवारी सकाळी राज्याच्या पोलीस मुख्यालयातून राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


संशयितांकडे कसून चौकशी करत, नाकाबंदीच्या सूचनेनंतर पोलिसांनी कडेकोट फौजफाटा तैनात केला आहे. अशात सोशल मीडियासह दहशतवादी संघटनांच्या सर्व हालचालींवर राज्य दहशतवाद विरोधी पथक लक्ष ठेवून आहे. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये श्वान पथकेही सर्व परिसर पिंजून काढत आहेत. तर महत्त्वाच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालत आहेत. या हल्ल्यानंतर मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने १९ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल एअर मिसाईल, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन इत्यादी उड्डाणावर बंदी आहे.


मराठवाड्यात जल्लोष
औरंगाबादला गुलमंडीवर मिठाई वाटण्यात आली. न्यायालय परिसरात वकिलांनीही जल्लोष केला. परभणीत सर्वधर्मीय समाज बांधवांनी जल्लोष केला. युवा सेनेने पेढे वाटले. महिला वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले. सराफ संघटनेने फटाके फोडले. नांदेडमध्ये नागरिकांनी पेढे वाटून ‘हाऊ इज द जोश़़. हाय है’ अशा घोषणा दिल्या़ उस्मानाबादला तरुणांनी फटाके फोडले. हिंगोलीत पेढे वाटण्यात आले. लातूर शहरासह जिल्ह्यात उदगीर, तांदुळजा आणि निटूर येथे नागरिकांनी जल्लोष केला.


सोलापुरात जल्लोष
सोलापूरमध्ये विविध संघटना, राजकीय पक्ष, संस्था, शाळा, महाविद्यालयांनी आनंदोत्सव साजरा केला. शिवसेनेने नवी पेठेत मिठाई वाटली. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाने आतषबाजी केली.


कोल्हापूरला जिलेबी वाटप
कोल्हापूरमध्ये नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष केला. बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करणारा मोठा फलक लावला होता. सांगली, मिरजेसह जिल्हाभर जल्लोष करण्यात आला. साताºयात पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.

विदर्भात पेढे वाटले... नागपूरसह विदर्भात नागरिकांनी जल्लोष केला. नागपूर महानगरपालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज फडकावत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे दिले. पेढे वाटून जिल्ह्याजिल्ह्यांत आनंद साजरा करण्यात आला. पश्चिम वºहाडात राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांनी जल्लोष केला. अकोल्यात शिवसैनिकांनी फटाके फोडले.

Web Title: Carnival in the state after second surgical strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.