व्यंगचित्र म्हणजे प्रबोधनाचे व्रतच

By Admin | Published: May 8, 2016 11:06 PM2016-05-08T23:06:46+5:302016-05-08T23:06:46+5:30

व्यंगचित्रातून मोठा आशय फार कमी जागेतून मांडता येतो. संपूर्ण वृत्तपत्रापेक्षा एखादे व्यंगचित्र नेहमीच जास्त चर्चेत राहते. व्यंगचित्रकार असणे हा पेशा नाही तर समाज प्रबोधनाचे एक व्रतच आहे

Cartoon is the fast of fasting | व्यंगचित्र म्हणजे प्रबोधनाचे व्रतच

व्यंगचित्र म्हणजे प्रबोधनाचे व्रतच

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर : व्यंगचित्रातून मोठा आशय फार कमी जागेतून मांडता येतो. संपूर्ण वृत्तपत्रापेक्षा एखादे व्यंगचित्र नेहमीच जास्त चर्चेत राहते. व्यंगचित्रकार असणे हा पेशा नाही तर समाज प्रबोधनाचे एक व्रतच आहे. हे व्रत करण्यासाठी कलावंतांची साधना लागते, अभ्यास लागतो आणि अनुभवही लागतो. त्यामुळेच व्यंगचित्र कला अतिशय महत्त्वाची आहे, असे मत लोकमतच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.
लोकमत समूहाने व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदितांना संधी देण्यासाठी जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ४ ते ८ मे दरम्यान लक्ष्मणरेषा या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आणि कार्यशाळेचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ, नागपूर येथे केले होते. या प्रदर्शनाचा रविवारी समारोप करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, मुख्य अतिथी म्हणून माजी खा. बनवारीलाल पुरोहित तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र, व्हीडीएनएचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक उपस्थित होते. या प्रदर्शनात जगभरातील नामांकित व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मागविण्यात आली. यातील निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनासाठी देशातील आणि जगातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी त्यांचे व्यंगचित्र पाठविले होते. यात व्यावसायिक आणि नवोदित व्यंगचित्रकारांचे दोन गट करण्यात आले. यात व्यावसायिक गटात ११ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दैनिक भास्कर समूहाचे व्यंगचित्रकार लाहिरी इस्माईल यांना जाहीर करण्यात आले. ७५०० रुपयांचे द्वितीय पारितोषिक द हिंदूचे व्यंगचित्रकार सुरेंद्र यांना आणि ५००० रुपयांचे तृतीय पारितोषिक मुक्त व्यंगचित्रकार इरफान खान यांना जाहीर करण्यात आले. व्यावसायिक गटातील प्रोत्साहनपर पुरस्कार प्रत्येकी ५ हजार रुपये उमेश चारोळे, मन्सुर नक्वी- डीबी पोस्ट, शेखर गुहेरा - पंजाब केसरी, किर्तीशा भट - बीबीसी, बिजॉय बिस्वाल आणि नई दुनियाचे व्यंगचित्रकार देवेंद्र शर्मा यांना प्रदान करण्यात आले.
नवोदित गटात ५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक कौस्तुभ खंगार, द्वितीय ४ हजार रुपयांचे पारितोषिक कल्याणी उपाध्याय आणि तृतीय २ हजार रुपयांचे पारितोषिक विजय इंगळे यांना प्रदान करण्यात आले. प्रोत्साहनपर पुरस्कारात प्रत्येकी १ हजार रुपये देवांक मेश्राम, पल्लव चहांदे, सांची अरमरकर यांना देण्यात आले.

वृत्तपत्रांचे कार्य रचनात्मक असले पाहिजे
याप्रसंगी खा. विजय दर्डा म्हणाले, श्रद्धेय बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांची भूमिका नेहमीच वृत्तपत्रांनी रचनात्मक कार्य करावे अशी होती. त्यांच्या आदर्शावर चालताना लोकमत समूह त्यांच्या भूमिकेवरच चालतो आहे. वृत्तपत्रांनी रचनात्मक काम केले तर समाजाला त्याचा लाभ होतो आणि जनतेचा वृत्तपत्रांवरील विश्वासही वाढतो. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त एकाच वेळी सर्व ठिकाणी लोकमतने हा दिवस साजरा केला. यात सर्वच वृत्तपत्रांच्या व्यंगचित्रकारांना सहभागी करून घेण्यात आले आणि त्याला प्रतिसादही लाभला. वृत्तपत्रांची स्पर्धा बातम्यांच्या बाबतीत असावी, माणसांशी नव्हे. चांगल्या कार्यासाठी वृत्तपत्रांनी व्यावसायिक स्पर्धा टाळून एकत्रित आले पाहिजे. व्यंगचित्रदेखील समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला जागरूक करण्यासाठी चांगल्या व्यंगचित्रकारांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच लोकमतने हा पुढाकार घेतला, असे ते म्हणाले. याप्रसंगी सर्वच अतिथींनी लोकमतच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे संचालन लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान यांनी केले.
—————
लिंबो स्केटिंगचा विश्वविक्रम करणाऱ्या सृष्टी शर्माचा सत्कार
या कार्यक्रमाला लिंबो स्केटिंगचा दोनदा विश्वविक्रम करणारी विदर्भाची ११ वर्षीय खेळाडू सृष्टी शर्मा उपस्थित होती. खा. विजय दर्डा यांनी भाषणात तिचा उल्लेख करून तिला मंचावर बोलाविले आणि लोकमततर्फे तिचा विशेष सत्कार केला. याप्रसंगी तिला गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सृष्टीने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी लिंबो स्केटिंगचा विश्वविक्रम कायम केला. तिने २५ मीटर अंतर केवळ १७ सेंटीमीटर (६.६९ इंच) उंचीच्या रॉडच्या खालून पार करीत नवा विश्वविक्रम केला. तिने हा प्रयत्न पूर्व वर्धमाननगरातील सेंटर पॉर्इंट शाळेच्या प्रांगणात गिनीजच्या चमूसमोर केला. यानंतर तिच्या विक्रमाची नोंद गिनीजमध्ये करण्यात आली. वर्षभरापूर्वी सृष्टीने सारख्याच उंचीवरील प्रथम विक्रमही प्रस्थापित केला होता. प्रतिभावंत सृष्टीच्या विश्वविक्रमासाठी लोकमतने कार्यक्रम आयोजित केला होता. यासंदर्भातील औपचारिकताही लोकमतनेच पूर्ण केल्या. सृष्टीचे वडील वेकोलित चालक आहेत. विश्वविक्रम केल्यावर सृष्टीला वेकोलिने त्यांचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर केले आहे. वेकोलिच्या संकेतस्थळावर लोकमतच्या बातमीसह तिचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर असलेले छायाचित्र याप्रसंगी सृष्टीने खा. विजय दर्डा यांना भेट दिले.

Web Title: Cartoon is the fast of fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.