व्यंगचित्रकारीता पेशा म्हणून स्वीकारण्याची परिस्थिती नाही

By Admin | Published: May 5, 2016 01:58 PM2016-05-05T13:58:09+5:302016-05-05T20:03:28+5:30

म्राट नेपोलियनपासून ते जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरपर्यंत अनेकांनी या व्यंगचित्रांच्या स्ट्रोक्सची धास्ती घेतली होती.

Cartoonization is not the case of acceptance as a profession | व्यंगचित्रकारीता पेशा म्हणून स्वीकारण्याची परिस्थिती नाही

व्यंगचित्रकारीता पेशा म्हणून स्वीकारण्याची परिस्थिती नाही

googlenewsNext

 

व्यक्तीचित्र वेगळया रुपात, आकारात आकर्षक पद्धतीने कॅनव्हासवर साकारताना त्यातून नेमका संदेश देण्याच्या शैलीमुळे व्यंगचित्र पाहणा-याचे लक्ष खिळवून ठेवते. जगाच्या इतिहासात समाजमत तयार करण्यात व्यंगचित्रांनी महत्वाची भूमिका बजावल्याची अनेक उदहारणे आहेत. सम्राट नेपोलियनपासून ते जर्मन हुकूमशहा अडॉल्फ हिटलरपर्यंत अनेकांनी या व्यंगचित्रांच्या स्ट्रोक्सची धास्ती घेतली होती. भारतातही व्यंगचित्रांचा एक काळ होता ज्यावेळी समाजमनावर व्यंगचित्रांचा प्रभाव होता. वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्राला महत्वाचे स्थान होते. खरतर थेट मनाचा ठाव घेणारी ही कला काळानुसार अधिक प्रभावी व्हायला हवी होती. पण माध्यमांमध्ये प्रगती होत असताना व्यंगचित्र कला मात्र मागे पडत गेली. 
 
व्यंगचित्रकारांना आजही समाजात आदराचे स्थान असले तरी, त्या तुलनेत त्यांना मोबदला मिळत नाही. तोकडे मानधन ही व्यंगचित्रकारांची मोठी समस्या आहे. व्यंगचित्रकलेला पेशा म्हणून स्वीकारावे अशी आजची परिस्थिती नाही असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना सांगितले. आवड म्हणून तुम्ही व्यंगचित्रे काढू शकता पण त्याला तुम्ही पेशा बनवू शकत नाही. व्यंगचित्रकारीता करताना चरितार्थ चालवण्यासाठी तुमचा दुसरा जोड व्यवसाय असलाच पाहिजे असे वाईरकर यांनी सांगितले. 
 
व्यंगचित्रकारीता करणारी बहुतांश मुले करीयर म्हणून अॅनिमेशनकडे वळतात. पण आज अॅनिमेशन व्यवसायातही मंदी सुरु आहे. काही वर्षांपूर्वी अॅनिमेशनमध्ये भरघोस वेतन मिळत असल्याने युवापिढीचा कल तिकडे वाढला होता. पण भारतातील अॅनिमेशन उद्योग आऊटसोर्सिंगवर चालतो. परदेशातून मिळणा-या कामावर भारतातील अॅनिमेशन इंडस्ट्री आज मोठया प्रमाणावर अवलंबून आहे. सध्या आऊटसोर्सिंगचे काम कमी झाल्यामुळे भारतातील अॅनिमेशन उद्योगातही मंदी आहे. पर्यायाने अनेक अॅनिमेशन आर्टीस्ट बेरोजगार आहेत. भारतात चित्रपटांचा जसा प्रेक्षकवर्ग आहे तसा अॅनिमेशनपटाचा वर्ग अजून तयार झालेला नाही. 
 
व्यंगचित्रात तंत्रज्ञान 
तंत्रज्ञानाच्या प्रचंड प्रगतीमुळे कुठलेही क्षेत्र तंत्रज्ञानापासून अल्पित राहू शकलेले नाही. व्यंगचित्र कलाही त्याला अपवाद नाही. आजच्या व्यंगचित्रांना तंत्रज्ञानाचा टच आहे. वेळेनुसार व्यंगचित्राच्या साहित्यामध्येही सुधारणा झाल्यामुळे व्यंगचित्र काढणे अधिक सोपे आणि सोयीचे झाल्याचे व्यंगचित्रकार सुरेश सावंत यांनी सांगितले. आता व्यंगचित्र काढण्यासाठी अनेक पेन्स बाजारात उपलब्ध आहेत. एखादा स्ट्रोक चुकला तर, व्हाईट पेनने तो स्ट्रोक पुसण्याची सोय आहे. पूर्वी व्यंगचित्रकाराला त्या चित्रामध्ये दुरुस्तीची संधी फार कमी होती. आता व्यंगचित्रकार व्यंगचित्र पेपरवर रेखाटल्यानंतर ते कॉम्प्युटरवर स्कॅन करतात. तिथे वेगवेगळे रंग भरल्यानंतर ते व्यंगचित्र ई-मेलने पाठवून देता येते. 
 
तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीही व्यंगचित्रकारांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आजचे तरुण व्यंगचित्रकार जास्तीत जास्त संगणकाचा वापर करतात. जुने व्यंगचित्रकार अजूनही पेपरवर व्यंगचित्र काढण्याला प्राधान्य देतात. हाताने व्यंगचित्र रेखाटताना तुम्ही काही तरी नवीन निर्मिती करत असता.  त्यातून एक समाधान, आनंद मिळतो. संगणकारवरील टूलचा वापर करताना ते समाधान तुम्हाला मिळत नाही. हातामधून स्ट्रोक्सची निर्मिती होते असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी सांगितले. 

Web Title: Cartoonization is not the case of acceptance as a profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.