व्यंगचित्रे रोजच सुचतात, पण... - राज ठाकरे
By admin | Published: April 17, 2016 02:10 AM2016-04-17T02:10:09+5:302016-04-17T02:10:09+5:30
व्यंगचित्र काढायला वेळ मिळत नाही, पण व्यंगचित्र रोज सुचतात, कारण आपला देशच तसा आहे. वर्तमानपत्रांच्या प्रत्येक पानावर व्यंगचित्र दिसते खरे, पण मी व्यंगचित्रे काढले तर छापायचे
मुंबई : ‘व्यंगचित्र काढायला वेळ मिळत नाही, पण व्यंगचित्र रोज सुचतात, कारण आपला देशच तसा आहे. वर्तमानपत्रांच्या प्रत्येक पानावर व्यंगचित्र दिसते खरे, पण मी व्यंगचित्रे काढले तर छापायचे कुठे? हा प्रश्न निर्माण होतो. बाळासाहेबांमुळे सवय लागली आहे की, व्यंगचित्रांमध्ये भूमिका असली पाहिजे. मात्र, आता भूमिका मांडली की, अनेक वर्तमानपत्रांना त्रास होतो. त्यामुळे सोशल मीडिया माध्यम बरे आहे, त्यावर टाकले की जगभर पोहोचते,’ अशा परखड शब्दांत मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी फटकारे ओढले.
अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ हा व्यंगचित्रकारांच्या संमेलनाचा पहिला दिवस शनिवारी पार पडला. या वेळी व्यंगचित्रकला क्षेत्रातील नवोदितांना मार्गदर्शन करताना व व्यंगचित्रकला क्षेत्रातील आपला प्रवास राज ठाकरे यांनी उलगडला. व्यंगचित्र ही चित्रकलेची पहिली नव्हे, तर अखेरची पायरी आहे. या क्षेत्रातील नवोदित व्यंगचित्रकारांनी रिअॅलिस्टिक ड्राइंग आणि अॅनाटॉमी यांचा अभ्यास केला पाहिजे. तोसुद्धा केवळ माणसांचा नव्हे, तर प्राण्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
चुकलो तर ओरडतील : आजही व्यंगचित्र काढताना, खासकरून स्केचिंग करताना सतत मनावर दडपण असते की, कुठूनतरी बाळासाहेब आणि माझे वडील बघत असतील. मी चुकलो तर मला ओरडतील, अशी मनात धास्ती असते. त्यामुळे मी जास्तीत जास्त योग्य प्रकारचे काम करण्याकडे कल असतो, असे राज यांनी सांगितले.
बाळासाहेबांची लाइन अप्रतिम
बाळासाहेबांची व्यंगचित्र काढण्याची लाइन अप्रतिम होती. बाळासाहेब जेव्हा स्केच करत, तेव्हा ते पुन्हा-पुन्हा पाहावे लागायचे. ते एकदाच रेषा काढायचे, तीच अंतिम असायची. त्यानंतर मग इंकिंगला बसायचे, माझ्यावरही तसेच संस्कार झाले आहेत. स्केच काढून झाले की, बाळासाहेब उठून १०-१५ मिनिटे फिरून यायचे. त्यानंतर काढलेले चित्र भिंतीला उलटे ठेवून पाहायचे, मग त्यात चित्रांतील चुका दिसतात आणि चित्रातील समतोलाचा अंदाज येतो. मग चुका सुधारून इंकिंग करायला घ्यायचे. तोपर्यंत इंकिंगला हात लावायचा नाही, हेच संस्कार आहेत.
गुढीपाडव्याला
व्यंगचित्रे काढून झाली
गुढीपाडव्याच्या सभेला १०-१२ व्यंगचित्रे काढून झालेली आहेत, पण ती कागदावर उतरवायला वेळ मिळाला नाही. तोंडाच्या वाटेने येणाऱ्या गोष्टी वेगळ््या असतात आणि चित्राच्या वाटेने येणाऱ्या गोष्टी वेगळ््या असतात. त्यामुळे ते चित्ररूपात मांडायला वेळ लागेल, पण दाखवेन नंतर तुम्हाला, असे आश्वासन राज यांनी या वेळी दिले.