धबधब्यांचा खळखळाट

By admin | Published: July 2, 2017 12:35 AM2017-07-02T00:35:39+5:302017-07-02T00:35:39+5:30

जागर -- रविवार विशेष

Cascade of waterfalls | धबधब्यांचा खळखळाट

धबधब्यांचा खळखळाट

Next

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आला पाऊस ... भिजून घ्या !
का मित्राने वर्षारंभाचे स्वागत करताना या चार ओळी व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविल्या, तेव्हा खिडकीतून बाहेर पाहण्याचा मोह झाला. सह्याद्रीच्या पर्वतरांगातून घोंगावत येणाऱ्या वाऱ्याच्या झोतात काळे काळे ढग वाहत पुढे जाताना दिसत होते. नैर्ऋत्य मान्सून पावसाचा हा शिडकावा वाढत वाढत जाणारा आहे. आपली शिवारं भिजवत जाणार आहे. रयतेची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. नदीच्या पात्रातून पाणी बाहेर पडण्याची वाट पाहत आहे. नाशिकजवळच्या महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखरापासून दक्षिणेकडे पसरलेल्या सह्याद्रीचा वर्षा आनंद घेणे ही स्वप्नवत बाब आहे. महाराष्ट्राला सुमारे ८४० किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि जवळपास तेवढ्याच लांबीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगामध्ये सरासरी सुमारे पाच हजार मिलिमीटर पाऊस अनेक ठिकाणी कोसळतो.
कळसूबाईच्या माथ्यापासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर असलेल्या पारगडपर्यंत असंख्य अशी शिखरे, पर्वतरांगा, गडकोट किल्ले, नद्यांची खोरी आहेत. कळसूबाईच्या बाजूलाच प्रवरा नदीचा उगम होतो. याशिवाय अन्य नद्यांची खोरीही आहेत. भंडारदरा धरण तेथेच ब्रिटिशांनी १९२६ मध्ये उभारले आहे. भीमाशंकरचा नजारा आणि भीमा, कुकडी तसेच घोडनदीची उगमस्थाने नगर-पुण्याच्या सीमेवरून पूर्वेला जातात. लोणावळा आहे, पुण्याच्या थेट पश्चिमेला ताम्हिनी घाट म्हणून प्रसिद्ध असलेले मुळशी नदीचे खोरे आहे. या घाटाकडे जाताना मुळशी धरणाचे पाणी एका बाजूला आणि पश्चिम-पूर्व पसरलेल्या पर्वतरांगांतून वाहणारे डझनभर धबधबे एकाच ठिकाणी पाहता येतात. नीरा नदीचे भोर परिसरातील उगमस्थान ते पाचगणी-महाबळेश्वरचा परिसर हा एक चमत्कारच आहे. महाबळेश्वरचा पाऊस अनुभवण्याची गंमत औरच आहे. शिवाय ते एक उत्तम पर्यटन शहर असल्याने तिन्ही ऋतूंमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कृष्णा नदीच्या उगमाचे केंद्रही तेच आहे. शिवाय कोयनेसह पाच नद्यांचा उगमही याच परिसरात आहे. महाबळेश्वर ते तापोळा हा मार्ग आणि कोयनेचे दक्षिणोत्तर पसरत आलेले पाणी, त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्यागार शालू नेसलेल्या पर्वतरांगा पाहणे अद्धितीय आहे. महाबळेश्वरहून प्रतापगडामार्गे पोलादपूरकडे जाणारा घाट हा कदाचित महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर घाट असेल.
कोयनेचा परिसर, साताऱ्याचे कास पठार, कास तलाव, सांगलीचे चांदोली अभयारण्य, शाहूवाडीतील आंबाघाट, विशाळगडच्या मागे दऱ्याखोऱ्यात पडणारा सहा हजार मिलिमीटरचा पाऊस, गगनबावड्याचे धुके, मध्येच अणुस्कुरा घाट, तेथील पठार ही सर्वस्थळे निसर्गाचे चमत्कारच आहेत. कोयनेजवळच्या नवजाचा धबधबा सर्वांत मोठा आणि उंचीने अधिक असावा. या धबधब्याच्या समोर उभे राहिले तर वर्षाआनंद काय असतो ते समजते. तिन्ही बाजूने असलेल्या डोंगरावरून जणू मान्सूनचे वाहक असणारे ढग कोसळतच पुढे जातात. ढगातून पडणारा तो थेंब अंगावर पडेपर्यंत सरळ एका रेषेत दिसतो. कोयनेपासून केवळ आठ-दहा किलोमीटरवर असतानाही तेथे सव्वापट अधिक पाऊस कोसळतो. चिपळूणकडे घेऊन जाणारा कुंभार्ली घाट, आंबातून रत्नागिरीकडे, गगनबावड्यातून वैभववाडीत आणि फोंड्यातून नांदगावकडे असे अप्रतिम घाटमाथे आहेत. आंबोलीचा नजारा आणि तेथील धबधब्यांचा खळखळाट सर्वांना आकर्षित करीत राहतो. संपूर्ण चंदगड तालुकाच निसर्गाने या दिवसात नटलेला असतो. पारगडवरून ते मोहक दृश्य पाहणे आकर्षक असते. शिवाय पश्चिमवाहिनी तिलारी नदीच्या पसरलेल्या पाण्याचा परिसर सुंदर आहे.
हा सर्व प्रवास सांगण्याचे कारण असे की, अलीकडच्या काळात पर्यटनाचा अमाप उत्साह असतो. मग ऋतू कोणताही असो. ऊन असो की थंडी किंवा कोसळणारा पाऊस असो. एक-दोन-तीन दिवस सलग सुट्या आल्या की, लोकांच्या झुंडीच्या झुंडी या पर्यटनस्थळावर गर्दी करतात. वर्षा पर्यटनाचा जोर अलीकडच्या आठ-दहा वर्षांत खूप वाढला आहे. खेड्या-पाड्या, वाड्या-वस्त्यांवर आणि दऱ्या-खोऱ्यात रस्ते झाले आहेत. लोकांकडे वाहने झाली आहेत. एका दिवसातही दोन-चारशे किलोमीटरचा प्रवास करून धावाधाव करीत पर्यटन करून आल्याचा आनंद अनेकजण व्यक्त करीत असतात. मात्र, वर्षा पर्यटनाला तरुणाईकडून (विशेषत: पुरुषांनीच म्हणायला हवे) गालबोट लागले जात आहे. नवजाचा धबधबा असो की, अणुस्कुराकडील बर्की किंवा राधानगरीजवळचा राऊतवाडीचा धबधबा, या मार्गावर तरुणांचा नंगानाच चालू असतो. आंबोलीच्या धबधब्याकडे तर सुटीच्या दिवशी जाऊच नये, अशी परिस्थिती असते. रस्त्याकडेला गाड्या लाऊन घाटाच्या भिंतीवर दारूच्या बाटल्या ठेवून पिऊन तर्र असलेल्या पुरुष मंडळींना कशाचेही भान राहत नाही. अंगात छोटी चड्डी आणि असेल तर बनियन घालून भिजलेली ही नादान मंडळी कोणाचीही गय करीत नाहीत. अनेक ठिकाणी गाडीतील टेप मोठमोठ्यांनी लावलेले असतात. धिंगाडधिंगा गाण्यावर हिडीस प्रकारे नृत्य केल्याचा आव आणून धिंगाणा चालू असतो. बर्की किंवा राऊतवाडीच्या धबधब्याच्या मार्गावरील गावे तर या त्रासाने वैतागून गेली आहेत. राऊतवाडीच्या धबधब्याला जाण्याच्या मार्गावरील पडळी ग्रामपंचायतीने ‘पर्यटकांना गावामध्ये प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे’ असे फलक गावच्या वेशीवर लावून ठेवले आहेत. त्यावरही ही मंडळी ऐकली नाहीत, तर एक दिवस मार खाऊन घरी येणार आहेत.
दारू पिण्याच्या हिडीस प्रकाराने वर वर्णन केलेल्या संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगातील निसर्गाचे ऐतिहासिक स्थळांचे आणि जैवविविधतेच्या स्थळांचे पावित्र्य भंग पावते आहे. आंबोली किंवा नवजा अशा धबधब्यांच्या ठिकाणी शेकड्यांनी लोक येतात. त्यात महिलांचाही मोठा सहभाग असतो. त्यांना स्वच्छतागृहाची किंवा कपडे बदलण्यासाठी साधी सोय नाही. गैरसोयी तर सर्व पाचवीला पूजलेल्या आहेत. पन्हाळागडाची सुद्धा हीच अवस्था आहे. कोणत्याही ठिकाणाचा लोक स्वच्छतागृह म्हणून वापर करताना दिसतात. या सर्वांतून वाहतुकीची कोंडी, निसर्गातील प्रदूषण, हिडीस प्रकारांचे दर्शन, आदी बाबींनी सह्याद्रीच्या रांगातून कोसळणाऱ्या धबधबा परिसराचे पावित्र्यच नष्ट होत आहे.
या सर्वांवर पोलिसांनी उपाय काढावा, अशी आपल्या सर्वांची अपेक्षा असते. ती काही प्रमाणात बरोबरही आहे. कारण ग्रामस्थांनी उपाय करायचे म्हटले की, वादावादीचा विषय ठरू शकतो. त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये, असे तेच पुन्हा म्हणू शकतात. त्यामुळे अशा सर्व स्थळांच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आणि कारवाई करायला हवी आहे. शिवाय ग्रामस्थांनीसुद्धा पडळी गावाप्रमाणे आगावूपणा करणाऱ्यांना हटकले पाहिजे.
साताऱ्याच्या माथ्यावर असलेल्या कास पठाराची अवस्थाही अशीच झाली. त्याची प्रसिद्धी इतकी झाली की, हजारो गाड्यांनी लोक कास पठारावरील फुलांचा साज फुलला की तेथे धावू लागले. त्या फुलांमध्ये फिरू लागले, त्यावर नाचू लागले, लोळू लागले, फोटो काढू लागले; पण या फुलांची दरवर्षी कोणीही लागवड न करता येणारी छोटी-छोटी वृक्षवल्ली त्यामुळे नष्ट होणार आहे, याचेच भान कोणाला नाही. हाच प्रकार सर्वत्र होताना दिसतो आहे. सह्याद्रीच्या संवर्धनासाठी त्याच्या निसर्ग सौंदर्याच्या संवर्धनासाठी आपण असे वागू या नको. दारू पिणाऱ्यांनी योग्य ठिकाणी जावे. सार्वजनिक ठिकाणी, निसर्गाच्या अद्वितीय आनंदाच्या स्थळी महिला वर्गाच्या साक्षीने हे हिडीस प्रकार करू या नको. निसर्गाने आणखीन किती सुंदर जीवन द्यायचे? ते नष्ट करण्याचा आणि इतरांचा आनंद बरबाद करण्याचा तुम्हा-आम्हाला काय अधिकार आहे? --- वसंत भोसले

Web Title: Cascade of waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.