विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी नातेवाइकांचा डॉक्टरांना घेराव
By admin | Published: January 29, 2015 03:30 AM2015-01-29T03:30:40+5:302015-01-29T03:30:40+5:30
गर्भपिशवीची गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांना घेराव घातला
कणकवली : गर्भपिशवीची गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांना घेराव घातला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी या नातेवाइकांनी केली आणि रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यास घेण्यास नकार देत त्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या दिला होता.
जयश्री राजेंद्र शिंगाडे (४०) यांची दहा वर्षांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली होती. गेले वर्षभर त्यांच्या पोटात दुखत असल्याने २१ जानेवारीला त्यांची सोनोग्राफी करण्यात आली. त्यानंतर गर्भपिशवीला गाठ झाली असून, ती काढण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयात देण्यात आला. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर पाटील यांनी पगार झाला नसल्याचे सांगत शिंगाडे यांची शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंगाडे कुटुंबियांनी डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांच्याकडून शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरविले आणि मंगळवारी जयश्री यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी सकाळी शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. त्यादरम्यान जयश्री यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच जयश्री यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला. कणकवली पोलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही नातेवाइकांनी केली. तर, भूलतज्ज्ञांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे इनकॅमेरा शवविच्छेदन व्हावे; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. (प्रतिनिधी)