गावबंदी मोडल्यास अॅट्रॉसिटी दाखल करू
By admin | Published: November 17, 2015 01:02 AM2015-11-17T01:02:01+5:302015-11-17T01:02:01+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महादेव कोळी, कोकणा, परधान, ठाकर यांसह १७ जातींच्या फेरसर्वेक्षणास आदिवासी विकास परिषदेचा विरोध असून, पथकाला गावबंदी केल्यानंतरही
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या महादेव कोळी, कोकणा, परधान, ठाकर यांसह १७ जातींच्या फेरसर्वेक्षणास आदिवासी विकास परिषदेचा विरोध असून, पथकाला गावबंदी केल्यानंतरही ते गावात आल्यास त्यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला आहे.
आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, शासनाने १७ जातींचे टप्प्या टप्प्यात फेरसर्वेक्षण सुरू केले असून, पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, तसेच अकोला येथे पुणे विद्यापीठाच्या पथकांमार्फत १७ जातींचे फेर सर्वेक्षण सुरू झाले आहे. २५ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी, इंदोरे, सोनोशी, धानोशी, अडसरे गावांमध्ये महादेव कोळी जातीच्या आदिवासींचे फेर सर्वेक्षण होणार आहे. ‘आम्ही सर्वेक्षणास विरोध केला असून, राज्यभरात फेर सर्वेक्षण होणाऱ्या गावांमध्ये ‘चालते व्हा, घरात घुसाल, तर अॅट्रासिटी दाखल करू’ असे फलक लावले आहेत.
पिचड म्हणाले, ‘आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना गावबंदी करण्याबाबत ग्रामसभेत ठराव करण्यास सूचित केले आहे. धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध असून, आम्ही नागपूरला ११ डिसेंबरला मोर्चा काढणार आहोत.’
हरसूल दंगलीचा दाखला!
आदिवासींच्या भावनांशी खेळल्यास काय होते, याचा प्रत्यय हरसूलच्या दंगलीतून आला आहे. त्यामुळे कोणतेही पथक फेर सर्वेक्षणास आल्यास त्यांना गावात घुसू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.