औरंगाबादमध्येही ‘वाळीत’ प्रकरण
By admin | Published: January 9, 2015 01:47 AM2015-01-09T01:47:27+5:302015-01-09T01:47:27+5:30
रायगड जिल्ह्णापाठोपाठ आता औरंगाबाद येथेही वाळीत प्रकरण उघडकीस आले आहे़ एकाच जातीतील, एकाच गोत्रातील तरुणासोबत प्रेमविवाह केला.
औरंगाबाद : रायगड जिल्ह्णापाठोपाठ आता औरंगाबाद येथेही वाळीत प्रकरण उघडकीस आले आहे़ एकाच जातीतील, एकाच गोत्रातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. तरीही कंजारभाट समाजाच्या एका दाम्पत्याबरोबरच त्यांच्या आई, वडील, भावांना जातपंचायतीने आठ वर्षांपासून समाजातून बहिष्कृत केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या दाम्पत्याने जातपंचायतीला दंडाच्या रूपात आतापर्यंत १ लाख ७० हजार रुपयेही दिले; तरीही बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. अखेर या दाम्पत्याने सिडको एमआयडीसी ठाण्याचे दार ठोठावले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
जाधववाडीतील सिद्धेश्वर कॉलनीतील रंजना सचिन पांडे (३५) यांना २००२ मध्ये तिच्या पहिल्या पतीने सोडून दिले. त्यानंतर ती एकटीच राहत असताना तिची नारेगावातील विशाल तामचीकर याच्याशी ओळख झाली. दोघे एकाच समाजाचेच. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच त्यांना एक मुलगी झाली. घरच्यांची मान्यता असतांना समाजाला ही बाब खुपली. कंजारभाट समाजातील रूढीनुसार एकाच गोत्रातील तरुण-तरुणीचा विवाह होऊ शकत नाही. हे समाजाच्या परंपरेविरोधात आहे. त्यामुळे तुम्हाला बहिष्कृत करण्यात येत आहे’ असा निर्णय घेऊन या दोघांबरोबरच त्यांच्या आई- वडील, भावांच्या कुटुंबालाही पंचायतीने वाळीत टाकले. (प्रतिनिधी)
पावणेदोन लाख उकळले!
२००६ मध्ये जातपंचायतीत हा विषय ठेवण्यात आला. तेव्हा पंचायतीने या दोघांना गुन्हा केला म्हणून आधी दहा हजार रुपये दंड भरा, असा आदेश दिला. त्यांच्याकडून दहा हजार रुपये भरून घेतले. नंतर पुण्यातील पिंपरी-चिंचवड, आळंदी, इचलकरंजी, संगमनेर व औरंगाबाद याठिकाणी भरविण्यात आलेल्या वेगवेगळ्या जातपंचायतींमध्ये दंडापोटी म्हणून दोघांकडून आतापर्यंत १ लाख ७० हजार रुपये वसूल करण्यात आले; तरीही बहिष्कार मागे घेण्यात आला नाही.
जातपंचायतीविरुद्ध बंड
अनेकदा विनवण्या करून, दंड भरूनही जातपंचायत बहिष्कार मागे घेण्यास तयार होईना, म्हणून रंजना आणि विशालने समाजाविरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आणि बुधवारी अखेर तिने सिडको एमआयडीसी ठाणे गाठले व जातपंचायतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून कंजारभाट जातपंचायतीचे महाराष्ट्र- कर्नाटक अध्यक्ष कविचंद भाट, औरंगाबादेतील पंचकमिटी सरपंच संपत मलके, उपसरपंच रतनू मलके, संजू तामचीकर, गोकुळ मलके, चरण माचरे, काळूराम मलके, बलबीर रावळकर, रामू इंद्रेकर, मजनू तामचीकर, धारासिंग माचरेकर (रा. सर्व नारेगाव, भाटनगर गल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले.