वक्फ जमीन घोटाळ्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:36 AM2021-11-14T07:36:44+5:302021-11-14T07:36:58+5:30
जालना जिल्ह्यात झाली जमिनीची खरेदी-विक्री अन् बांधकामही
मुंबई : जालना जिल्ह्यातील परतूर नगर परिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्थेकडील इनामी जमिनीची अनधिकृतपणे, बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री केल्याप्रकरणी तसेच काही जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी जालना जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मशिदीच्या नावे परतूर नगर परिषद हद्दीत ६.४९ हेक्टर आणि १.८७ हेक्टर इतक्या क्षेत्रफळाच्या जमिनी आहेत. या जमिनींचा वापर मशिदीच्या सेवेसाठी तसेच दैनंदिन खर्चासाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून करण्यात येतो. ही मशीद वक्फ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असल्याने त्याच्याकडील कोणत्याही मालमत्तेची विना परवानगी खरेदी-विक्री, गहाण, दान, बक्षीस इत्यादी होऊ शकत नाही. तथापि, जिल्हा वक्फ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी (सर्व रा. परतूर) यांनी संगनमत करून या इनामी जमिनीची बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री करून गैरव्यवहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार नवाब शाह उस्मान शाह, काजी नुरोद्दीन काजी अब्दुल रहीमोद्दीन, शेख आमेर उर्फ शानदार हनिफ कुरेशी, दत्ता शंकर पवार, शेख अब्दुल सत्तार शेख रज्जाक, लुकमान कुरेशी नादान कुरेशी, हुसेन यासीन शेख, अजहर शेख युनुस शेख, मोहम्मद शरीफ अब्दुल हमीद कुरेशी (सर्व रा. परतूर, जि. जालना) या ९ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी ही माहिती दिली.
वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री.