भगवान बाहुबली विटंबनेप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: January 12, 2015 03:36 AM2015-01-12T03:36:32+5:302015-01-12T03:36:32+5:30
जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाहुबली यांच्या मूर्तीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत
मुंबई : जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाहुबली यांच्या मूर्तीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. याबाबत संतापलेल्या जैन धर्मीयांनी शनिवारी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आता या आरोपींचा शोध घेत आहेत.
हिंदू धर्मीयांबाबत चुकीचा प्रचार केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आमीर खानच्या पीके चित्रपटाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने ‘पीके २’ची बनावट जाहिरात तयार करून त्यामध्ये जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बाहुबली यांच्या मूर्तीचे आक्षेपार्ह फोटो टाकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे फोटो व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. त्यामुळे भगवान बाहुबली यांच्याबद्दल समाजामध्ये चुकीची प्रतिमा पोहोचत आहे. याबाबत अहिंसा संघाचे मुनिराज विनम्रसागर महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शनिवारी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंंदोलन छेडण्याचा इशारा मुनिराज यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)