समाजातून वाळीत टाकल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:51 PM2017-07-18T19:51:34+5:302017-07-18T19:51:34+5:30
पिंपळे गुरव येथील वैदू वस्तीत राहाणाऱ्या रामभाऊ लक्ष्मण लोखंडे (वय ७०,रा.वैदू वस्ती, पिंपळेगुरव) यांना व त्यांच्या कुटूंबियांना जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 18 : पिंपळे गुरव येथील वैदू वस्तीत राहाणाऱ्या रामभाऊ लक्ष्मण लोखंडे (वय ७०,रा.वैदू वस्ती, पिंपळेगुरव) यांना व त्यांच्या कुटूंबियांना जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले. समाजाने वाळीत टाकले, अनेकदा शिक्षा म्हणनु मोठ्या रकमेचा दंड वसूल केला. जात पंचायतीकडून वारंवार कुटूंबाला त्रास होऊ लागल्याने सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत जात पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक बहिष्कार कायद्याचा पुण्यात सोमवारी राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला. पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये वैदू वस्तीत घडलेल्या अशाच घटनेप्रकरणी दाखल झालेला राज्यातील हा दुसरा गुन्हा आहे.
पुण्यात तेलगू मडेलवार (फंड) समाजातील ४० कुटूंबांना समाजातुन बहिष्कृत केल्याची घटना उघडकीस आली. पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध, बंदी, निवारण अधिनियम २०१६ नुसार राज्यातील पहिलाच गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण चव्हाट्यावर येताच, २०१४ पासून जातपंचायतीचा त्रास सहन करणाऱ्या पिंपरी चिंचवड हद्दीतील पिंपळे गुरव येथील वैदू समाजातील रामभाऊ लक्ष्मण लोखंडे यांनीही न्यायासाठी पाऊल उचलले. इतके दिवस अत्याचार सहन केले, यापुढे अत्याचार खपवून न घेण्याचा निर्धार करीत लोखंडे कुटूंबियांनी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले. तेथे जाऊन त्यांनी कैफियत मांडली. ठाणे अंमलदार अलका सरग यांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे. राजू रामा लोखंडे,प्रकाश रामा लोखंडे,दशरथ हुसेन लोखंडे,संभा बापू लोखंडे,शंकर यल्लप्पा लाखंडे, हणुमंत लोखंडे व वैदू जात पंचायतचे अन्य सदस्य यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
वैदू समाजाचे कुलदैवत बापदेव मंदिरात ऊरूसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी आमची तयारी असताना, आमच्या कुटूंबाची वर्गणी घेतली नाही. तसेच ऊरूसाच्या काळात मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. ही घटना रविवारी घडली. त्यामुळे रामभाऊ लोखंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मला समाजातून वारंवार बहिष्कृत केले जाते. शिक्षा म्हणून मोठया रकमेचा दंड वसूल केला जातो. समाजात होणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. मुलांची लग्न हाऊ देणार नाही. कुटंूबाला समाजात राहू देणार नाही. मंदिरात प्रवेश करू देणार नाही, अशा प्रकारे समाजातून वाळीत टाकण्याची कृत्य आरोपीने केली आहेत. जात पंचायतीच्या जाचक निर्णयाविरूद्ध आवाज उठविला म्हणुन माझ्या कुटूंबाला मानसिक त्रास दिला जात आहे. असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
आरोपीपैकी राजू रामा लोखंडे हे 2002 मध्ये महापालिकेचे महिला बालकल्याण विभागाचे सभापती होते तसेच 2004 मध्ये शिक्षण मंडळाच्या उपसभापती पदाचा पदभारही सांभाळला आहे