महिला पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2017 03:30 AM2017-03-29T03:30:36+5:302017-03-29T03:30:36+5:30
‘द क्विंट’ या वेबसाइटची पत्रकार पूनम अग्रवाल (रा़ दिल्ली) व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावर देवळाली
नाशिक : ‘द क्विंट’ या वेबसाइटची पत्रकार पूनम अग्रवाल (रा़ दिल्ली) व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सैन्य दलाचा जवान डीएस रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, लष्करी हद्दीत प्रवेश करून जवानांचे फोटो व व्हिडिओ क्लिप काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी आॅफिशियल सिक्रेट अॅक्टन्वये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़
अग्रवाल व दीपचंद यांनी फेब्रुवारीमध्ये बडीज ड्युटीच्या नावाखाली केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मॅथ्यू यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडून जवानांच्या पिळवणुकीबाबत तक्रार केली होती़ देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टिलरी सेंटरमध्ये लान्स नायक डीएस रॉय मॅथ्यू हे २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते़ २ मार्च २०१७ रोजी त्यांचा गळफास घेतलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बराकीमध्ये सापडला. त्यानंतर तपासात पूनम अग्रवाल व दीपचंद यांनी कॅम्पमधील हेगलाइन महिंद्रा इनकोच येथे स्टिंग आॅपरेशन केल्याचे उघड झाले होते़
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत मॅथ्यू यांनी लष्करातील अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. स्टिंग व्हायरल झाल्यानंतर आपले कोर्ट मार्शल होईल, अशी भीती मॅथ्यू यांनी व्हिडीओत व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली होती. (प्रतिनिधी)
डायरीचा तपास?
मॅथ्यू यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना तपासणीत त्यांचा मोबाइल व मल्याळम भाषेतील डायरी सापडली होती़ त्याची चौकशी सुरू असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी सांगितले होते.
विनापरवानगी लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून त्या ठिकाणची तसेच लष्करी जवान मॅथ्यूसह इतर जवानांची व्हिडिओ क्लिप काढून स्टिंग झाले. दोघांवर आॅफिशिअल सिक्रेट अॅक्ट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
- विनायक लोकरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक.