Mukesh Ambani Bomb Scare: मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास NIA कडे; एटीएसने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 04:22 PM2021-03-08T16:22:12+5:302021-03-08T16:24:30+5:30
Mukesh Ambani Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
मुंबई : जागतिक पातळीवर सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. (Mukesh Ambani Bomb Scare) या स्फोटकांसह धमकीचे पत्रही होते. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने यासंदर्भात माहिती दिली आहे. (case related to the recovery of explosives in a car near mukesh ambani house will be probed by nia)
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करणार आहे. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र एटीएसने गुन्हा नोंद केला आहे. सुरुवातीला मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग केल्याचे सांगण्यात आले होते. एनआयए या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले होते. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने यावर स्पष्टीकरण दिले.
Investigation of Mansukh Hiren death case will remain with the ATS and the case related to the recovery of explosives in a car near Mukesh Ambani's house will be probed by NIA, clarifies ATS
— ANI (@ANI) March 8, 2021
केवळ स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांचा तपास वर्ग
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली होती. मात्र, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांसंदर्भातील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडेच राहणार आहे, असे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले.
अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू
दरम्यान, गृह विभागाने यांच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांच्याकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील गूढ वाढत चालले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिरेन यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन्स वसई गावात होते.