रुग्णाला केसपेपर रेकॉर्ड देणे बंधनकारक!
By admin | Published: January 11, 2016 02:41 AM2016-01-11T02:41:11+5:302016-01-11T02:41:11+5:30
आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांकडून उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रीस्क्रिप्शन तसेच केसपेपर रेकॉर्ड दिले जात नाही. त्यामुळे नेमके कोणते उपचार सुरू आहेत
बुलडाणा : आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांकडून उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रीस्क्रिप्शन तसेच केसपेपर रेकॉर्ड दिले जात नाही. त्यामुळे नेमके कोणते उपचार सुरू आहेत, हे रुग्णाला समजत नसल्याने आता केंद्रीय आयुष मंत्रालयाने या दोन्ही पॅथीच्या कौन्सिलला पत्राद्वारे आदेश देऊन रुग्णाला ‘प्रीस्क्रिप्शन’सह रेकॉर्ड दाखविणे बंधनकारक केले आहे.
मलकापूर येथील श्रेयांश बागडे या तरुणाने माहिती अधिकारात याची माहिती मागविली होती. ग्रामीण भागात अॅलोपॅथीच्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक रुग्ण औषधोपचारासाठी आयुर्वेद, तसेच होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे जातात. यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टर नेमके कोणते उपचार करतात, कोणती औषधे देतात, याविषयी फारसे ज्ञान नसल्याने गोंधळ उडतो. याकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे त्यांनी लक्ष वेधले होते. आयुष विभागाने माहिती अधिकारातील या पत्राची गंभीर दखल घेतली. रुग्णाला त्यांच्या तपासणीचे रेकॉर्ड दाखविणे अथवा देणे हा रुग्णाचा हक्क आहे, असे आदेश देण्यात आले आहे.