कोणत्याही क्षणी गुन्हे दाखल होणार
By admin | Published: July 16, 2015 12:00 AM2015-07-16T00:00:53+5:302015-07-16T00:00:53+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्याची पूर्ण तयारी सरकारने केली असून, ही कारवाई आता कोणत्याही
- यदु जोशी, मुंबई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल करण्याची पूर्ण तयारी सरकारने केली असून, ही कारवाई आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. या घोटाळ्याची पाळेमुळे ‘लोकमत’ने खणून काढली होती.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे या महामंडळाचे अध्यक्ष असताना कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले गेले. या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी झाल्यानंतर घोटाळ्याची रक्कम ४०० कोटींहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी सांगितले की सीआयडीचे महासंचालक उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशी अहवाल सादर करणार आहेत. उद्या किंवा सोमवारी विधानसभेत याबाबत कारवाईची घोषणा सरकारकडून केली जाईल.
मनमानी कर्जवाटप, नियमबाह्य कर्मचारी भरती, नियमबाह्य खरेदी, कदम अध्यक्ष असलेल्या संस्थांना १४२ कोटी रुपये देणे, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात १९० कोटी रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप, जमीन खरेदी घोटाळा आदी अनेक प्रकरणांत हे महामंडळ खरडून खाण्यात आले.
‘लवकरच कारवाई’
विधानसभेत आज भाजपाचे डॉ. संजय कुटे यांनी या महामंडळातील घोटाळ्यांप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
महामंडळाच्या तिजोरीवर डल्ला मारणारे घोटाळेबाज अद्याप मोकाट का आहेत, असा सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात खाल्लेल्या पैशांची वसुुली केली तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे सहज शक्य होईल, असा टोला त्यांनी हाणला.
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी एकाही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. गोरगरिबांसाठी असलेल्या या महामंडळात घोटाळे करणाऱ्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. अधिवेशन संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.