नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:09 AM2024-11-20T05:09:48+5:302024-11-20T05:11:47+5:30

नालासोपारा येथील हॉटेल रूममधून बेकायदा साडेदहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर तीन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Cash drama in Nalasopara! Vinod Tawde surrounded by allegations of money distribution; Three cases were registered | नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल

नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल

मंगेश कराळे, पालघर/नालासोपारा
Maharashtra Election News: नालासोपारा येथील हॉटेल रूमवर बेकायदा रोकड सापडल्याने, तसेच मतदारसंघात बेकायदा प्रवेश करून पत्रकार परिषद घेतल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर तुळींज पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी हॉटेलच्या रूममधून भरारी पथकाने १० लाख ४० हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रमेश मनाळे यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्यामुळे हॉटेलबाहेर जवळपास तीन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नालासोपारा येथील मोरेगाव परिसरातील विवांता हॉटेलमध्ये मंगळवारी भाजपचे विनोद तावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी सुमारे पाच कोटींची रक्कम वाटप करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बविआचे आ. क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. हितेंद्र ठाकूर पोहोचल्यानंतर ताब्यात घेतलेल्या डायऱ्या त्यांना देण्यात आल्या. त्यातील  पाने ठाकूर यांनी माध्यमांना दाखवली.

मतदारांना बोलावून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी निवडणूक अधिकारी व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निवडणूक विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह फिरत्या भरारी पथकाने तपासणी केली असता हॉटेल रूमवर रोख रकमेसह काही कागदपत्रे सापडली. ती जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी ‘लोकमत’ला दिली.

हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, हे प्रकरण मिटवून टाका, आपण मित्र आहोत, असे मला समोरून ५० फोन आले. पण मी कोणाचे प्रेशर घेत नाही. निवडणूक आयुक्त आणि पोलिसांवर प्रशासनाचा मोठा दबाव आहे. हॉटेल रूममध्ये पाच कोटींची रक्कम होती. 

दरम्यान, हॉलेटमधून १० लाख ४० हजार ५०० रुपयांची बेकायदा रोकड जप्त करत विविध कलमांन्वये तुळींज पोलिस ठाण्यात तावडे आणि नाईक यांच्यावर दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती परिमंडळ-२च्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली. 

प्रचार संपल्यानंतर पुढील ४८ तासांच्या कालावधीत मतदारसंघातील मतदारांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी तसेच नेत्यांनी दुसऱ्या मतदारसंघात जाण्यास मनाई आहे. या प्रकरणी हितेंद्र ठाकूर, विनोद तावडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही तपासा, चौकशी होऊ द्या : विनोद तावडे 

मी पैसे वाटले नाहीत. तपास यंत्रणेने हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि निवडणूक आयोगाने सर्व घटनेची चौकशी करावी, असे निवेदन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जारी केले.

तावडे यांनी म्हटले आहे की, वाडा येथून मंगळवारी मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात भाजप उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली.

मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो.

निवडणुकीत पराभव दिसू लागतो तेव्हा जे होते, त्यातीलच हा प्रकार आहे. विनोद तावडे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याजवळ कुठलाही पैसा किंवा आक्षेपार्ह गोष्ट आढळलेली नाही. त्यांनी पैसे वाटलेले नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

भाजप-शिंदे-अजित पवारांचा हा ‘नोट जिहाद’ आहे. ‘बाँटेंगे और जितेंगे’ असे चालले आहे. आज जे घडले ते महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेच. सखोल चौकशी झालीच पाहिजे. भाजप नेत्याने टिप दिली असे म्हणतात; पण शिंदेही त्यात असू शकतात.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना

भाजप व महायुती पराभवाच्या भीतीने पैसा व सत्तेचा गैरवापर करत असून विनोद तावडे यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडल्याचा तो पुरावा आहे. तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप आहेत; त्यामुळे तावडे यांना तत्काळ अटक केली पाहिजे.
- रमेश चेन्नीथला, काँग्रेस राज्य प्रभारी

रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले

कर्जत/जामखेड : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या अधिपत्याखालील हळगाव (ता. जामखेड) येथील जय श्रीराम साखर कारखान्यातील एका अधिकाऱ्यास नान्नज गावात मतदारांना पैसे वाटप करताना पकडले. मधुकर मारुती मोहिते असे या व्यक्तीचे नाव असून पोलिस व फिरत्या पथकाने केलेल्या पंचनाम्यात त्याच्याकडे ४७ हजार रुपये सापडले. कर्जत तालुक्यातील वायसेवाडी येथेही अमोल दत्तू जमदाडे ही व्यक्ती मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आली आहे. जमदाडे यांच्याकडे ५३ हजार रुपये आढळले. जमदाडे बारामती तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Cash drama in Nalasopara! Vinod Tawde surrounded by allegations of money distribution; Three cases were registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.