एटीएम कॅशव्हॅनमधून धारावीत रोकड लुटली

By admin | Published: March 17, 2017 03:56 AM2017-03-17T03:56:18+5:302017-03-17T03:56:18+5:30

धारावी येथील ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’ (एसबीआय) या बँकेच्या एटीएम कॅश व्हॅनमधील पैशांची पेटी लुटारूंनी लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली

Cash Looted from ATM Cashway | एटीएम कॅशव्हॅनमधून धारावीत रोकड लुटली

एटीएम कॅशव्हॅनमधून धारावीत रोकड लुटली

Next

मुंबई : धारावी येथील ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’ (एसबीआय) या बँकेच्या एटीएम कॅश व्हॅनमधील पैशांची पेटी लुटारूंनी लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारुंचा प्रताप कैद झाला असून पोलिसांच्या तपासपथकांसह गुन्हे शाखा याचा समांतर तपास करत आहेत. यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची लूट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धारावी येथील ओएनजीसी बिल्डिंग जंक्शनवरील ‘एसबीआय’च्या एटीएम परिसरात ही घटना घडली. गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास बँकेची कॅश व्हॅन एटीएम सेंटरच्या समोरील रस्त्यावर थांबली. व्हॅनमधील तीन कर्मचारी छोट्या बॅगेत पैसे घेऊन एटीएममध्ये भरण्यासाठी पुढे आले. यावेळी चालक एकटाच व्हॅनमध्ये होता. दुपारी तीनच्या सुमारास टोळीतील एका लुटारूने चालकाला बोलण्यात गुंतवले. तर अन्य दोन साथीदारांनी कर्मचारी बाहेर येईपर्यंत व्हॅनमधून शिताफिने पैशांची पेटी लंपास केली. व्हॅनकडे आलेल्या कर्मचाऱ्यांना पेटी गायब झाल्याचे समजताच एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त आर.डी. शिंदे, पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्यासह धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत बांगर घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारुंचा प्रताप कैद झाला आहे. यामध्ये दोन तरुण पैशांची पेटी घेऊन टी जंक्शनकडे जाताना दिसत आहेत. यामध्ये तब्बल चार ते पाच जणांचा समावेश असल्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तवली आहे. यापैकी काही जण हे एटीएमबाहेर लक्ष ठेवून होते. तर अन्य दोन साथीदारांनी एटीएममधून पैसे पळविले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
यामध्ये बॅकेची तब्बल दीड कोटी रुपये चोरीला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामागे सराईत टोळीचा हात असून हा लुटीचा प्रयत्न पूर्व नियोजित असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामागे ज्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या कामगारांचा हात आहे का? या दिशेनेही तपास सुरू आहे. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

सुरक्षेबाबत उदासीनता
बॅकेच्या एटीएममध्ये
पैसे भरतेवेळी बंदूकधारी सुरक्षा रक्षक असणे बंधनकारक आहे. तसेच काही कामगारांनी गाडीत थांबणे गरजेचे असते. असे असतानाही संबंधित सुरक्षा एजन्सीने सारे नियम धाब्यावर बसविलेले दिसून आले. चालकाच्या विश्वासावर पैशांची पेटी सोडून तिघेही कर्मचारी पैसे भरण्यासाठी एटीएममध्ये गेले. यावेळी त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षा रक्षकही नव्हता.

Web Title: Cash Looted from ATM Cashway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.