सव्वासहा कोटींची रोकड जप्त; पालघर, कसाऱ्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:28 AM2024-10-31T11:28:48+5:302024-10-31T11:33:27+5:30

बुधवारी तलासरीत सव्वाचार कोटी तर कसाऱ्यात दोन कोटी रुपये नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

Cash of 1.56 crore seized; Police action during nakabandi in Palghar, Kasara | सव्वासहा कोटींची रोकड जप्त; पालघर, कसाऱ्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांची कारवाई

सव्वासहा कोटींची रोकड जप्त; पालघर, कसाऱ्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांची कारवाई

नवी मुंबई/कल्याण/तलासरी/कसारा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सध्या पोलिस आणि निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून खासगी वाहनांची तपासणी केली जात आहे. बुधवारी तलासरीत सव्वाचार कोटी तर कसाऱ्यात दोन कोटी रुपये नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

तलासरी तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी महाराष्ट्रात उधवामार्गे प्रवेश करणाऱ्या एका गाडीची झडती घेतली असता त्यांना त्यात ४ कोटी २५ लाख रुपयांची रोकड आढळली. ही रोकड एटीएममध्ये जमा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे वाहनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, ही रोकड गुजरात राज्यातील एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात असताना ती महाराष्ट्राच्या हद्दीत का आणण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलासरी पोलिसांनी रोकडसह वाहन ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मुंबई- नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामणवाडी पोलिस चौकीजवळ पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान नाशिकहून मुंबईकडे जात असलेल्या एका गाडीत दोन कोटी रुपयांची रक्कम आढळून आली. कसारा घाटाच्या पायथ्याशी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी केली जात होती. कारमध्ये संशयास्पद रक्कम सापडल्याने पोलिसांनी ताब्यात घेत वाहन जप्त केले.  

बोईसरमध्ये चार लाख  
बोईसरमध्ये वसई फाटा येथील तपासणी  नाक्यावर सोमवारी चार लाखांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक भरारी पथकाने ही कारवाई केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.  

पैसा पारेख भाईचा 
रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कारमधील दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता हे पैसे पारेख भाईचे आहेत, असे सांगितले. निवडणूक सहायक अधिकारी (खर्च) प्रमोद बच्छाव, नोडल अधिकारी नम्रता जगताप यांच्या उपस्थितीत ही रक्कम मोजण्यात आली. सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत कारवाई सुरू होती.

नवी मुंबईत ८६ लाख, कल्याणमध्ये आठ लाख   
सीवूडमध्ये बुधवारी ८६ लाख ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई कृष्णा हॉटेलसमोरील रोडवर पार्किंगमध्ये करण्यात आली आहे. तर कल्याणमध्ये दुर्गाडी चौकात दुचाकीस्वार तरुणाकडून आठ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली.  

Web Title: Cash of 1.56 crore seized; Police action during nakabandi in Palghar, Kasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.