नगदी पीक असलेला कांदाही आता रडवतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:28 PM2018-06-17T23:28:03+5:302018-06-17T23:28:03+5:30
राज्यात सुमारे चार ते साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
नाशिक- राज्यात सुमारे चार ते साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यात खरिपातील लाल कांद्याचाही समावेश असून, केवळ खरिपाच्या हंगामात अर्ली खरिपाच्या पोळ कांद्याचा आणि लेट खरिपातील रांगड्या कांद्यासह राज्यभरात सुमारे दीड ते दोन लाख हेक्टरवर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा लागवडीवर मान्सूनचे पर्जन्यमान आणि अन्य घटकांचा प्रभाव होत असला तरी गेल्या वर्षी खरिपाच्या लाल कांद्याला चांगला भाव मिळाला होता. यावर्षीही कांद्याचे चांगले पैसे मिळण्याच्या आशेने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी तयारीला लागला असून, मोठ्या प्रमाणात कांदा बियाणांची खरेदी होत असल्याने राज्यात यावर्षी कांद्याचे बंपर उत्पादन होण्याचे संकेत असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
देशात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात व राज्यस्थानमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यात दक्षिणेकडील कर्नाटक व आंध्र प्रदेशातून खरिपाच्या लागवडीला सुरुवात होत असून, राज्यात सोलापूरसह पुण्यातील लोणंद, चाकण या भागात अर्ली खरिपातील कांद्याची लागवड होते, तर कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव परिसरात म्हणजेच उत्तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यासह नाशिकच्या मालेगाव, नांदगाव चांदवड, येवला, सिन्नर या भागातही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते. राज्यातील कांदा उत्पादनाच्या एकूण ७० ते ८० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होत असले तरी आता जळगाव आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात व औरंगाबादच्या पैठणसारख्या भागातही कांद्याचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
या वर्षी नाशिक जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख हेक्टरवर कांदा लागवड होण्याची शक्यता आहे. सोलापूर, चाकण, लोणंद, पैठण, उस्मानाबादसह नाशिकच्या कमी पावसाच्या भागात शेतकºयांना दुसºया नगदी पिकाचा पर्याय नाही. या वर्षी हवामान विभागाने मान्सून समाधानकारक असल्याचे सूतोवाच केल्यामुळे शेतकºयांनी खरिपात लाल कांदा लागवडीची तयारी सुरू केली आहे, परंतु मान्सूनच्या आगमानानंतर किती क्षेत्रावर कांदा लागवड होणार हे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
>कांद्यापासून
मिळणारे उत्पन्न
कांद्याचे प्रतिएकर सरासरी १०० क्विंटल उत्पादन होते. त्यास सरासरी बाजारभाव ५०० रुपये मिळाल्यास एकूण ५० हजार रुपये उत्पन्न शेतकºयाला मिळते. त्यातून विक्र ीसाठी येणारा खर्च व हमाली-तोलाई ५०० रु पये, वाहतूक खर्च ४ हजार रुपये असा एकूण ४,५०० रुपये विक्र ी साठीचा खर्च वजा जाता केवळ ४५ हजार ५०० रुपये उत्पन्न शेतकºयांच्या हाती उरते.
>भांडवलाची चणचण
एकीकडे उन्हाळ कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना, दुसरीकडे जिल्हा बँकेनेही या वर्षी खरीप कर्जपुरवठ्याचे लक्ष्य हजार कोटींनी घटविले आहे. या वर्षी खरिपासाठी जिल्हा बँकेकडून केवळ ५०० कोटी कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा स्थितीत राज्य सरकारच्या किचकट अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना खरिपाच्या पिकासाठी कर्ज उपलब्ध होत नसून, कांदा लागवडीसाठी भांडवलाची चणचण भासत आहे.
>कांदा उत्पादन खर्च (एकरी)
बियाणे- ५ हजार रुपये
जमीन मशागत- ४ हजार रुपये
लागवड- ७ हजार रुपये
खते- १५ हजार रुपये
औषधे- ७ हजार रुपये
काढणी- ७ हजार रुपये
चाळीत साठवण मजुरी- ३ हजार रुपये
तण काढणे (किमान तीन वेळा)- ७ हजार रुपये
एकरी किमान खर्च- ५५ हजार रु पये