एटीएममध्ये रोकड टंचाई

By admin | Published: April 6, 2017 06:16 AM2017-04-06T06:16:41+5:302017-04-06T06:16:41+5:30

नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे.

Cash shortage in ATM | एटीएममध्ये रोकड टंचाई

एटीएममध्ये रोकड टंचाई

Next

मुंबई : नोटांची टंचाई निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट दिसत आहे. तीन-चार एटीएममध्ये जाऊनही रोख रक्कम मिळत नसल्याने लोकांचे हाल होत असून सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. लोकांना ‘कॅशलेस’ व्यवहारास भाग पाडण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून नोटांचा पुरवठा होत नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी केला आहे.
उटगी म्हणाले की, नोटबंदीनंतर काही एटीएममधील ‘कॅश रिकॅलिब्रेशन सिस्टम’मध्ये बदल करण्यात आला. मात्र अद्याप बहुतेक एटीएममध्ये नव्या २ हजार आणि पाचशे रुपये किंमतीच्या नोटांसाठी आवश्यक सॉफ्टवेअर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे मोजकेच एटीएम सुरू आहेत. त्यात ‘आरबीआय’कडून पुरेसा नोटांचा पुरवठा होत नसल्याने नोटाबंदीनंतर सुरू केलेले एटीएमही बंद होत आहेत. ‘आरबीआय’ने रोखून ठेवलेल्या नोटांमुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना कॅशलेसकडे नेण्यासाठी ‘आरबीआय’ आणि सरकारकडून जाणीवपूर्वक नोटांची टंचाई निर्माण होत असल्याचा गंभीर आरोपही उटगी यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांचा कॅशलेसवर अद्याप पूर्ण विश्वास नाही. तरीही लोकांना जबरदस्तीने कॅशलेस व्यवहारांना भाग पाडण्यासाठी सरकार नोटांची टंचाई निर्माण करत असल्याचा आरोपही उटगी यांनी केला आहे.
तर ‘आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’चे सहसचिव देविदास तुळजापूरकर म्हणाले की, राज्यात शेतीच्या कामांसह लग्नसराईचा जोर आहे. त्यात सरकारने बँक आणि एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांच्या मर्यादेवरील सर्व बंधने उठवली आहेत. परिणामी, एटीएमवर अधिक भार पडत आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्याभरात आलेल्या सुट्ट्यांमुळे बँक अधिक वेळ बंदच होत्या. त्यामुळे नोटांची टंचाई झाली आणि एटीएममध्ये कमी रोख रक्कम भरल्याने आता टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एटीएममधील नोटटंचाईच्या निषेधार्थ विदर्भात काही ठिकाणी शिवसैनिकांनी एटीएमची आरती करत आंदोलनही केले. (प्रतिनिधी)
>बँकांना दंड लावा!
एटीएम वापरावरील निर्बंधासाठी आरबीआयने काही राष्ट्रीयीकृत बँकांना ठराविक वापरानंतर ग्राहकांकडून दंड वसुलीस परवानगी दिली होती. मात्र आता गरजेच्या वेळी बँक एटीएम सेवा पुरवण्यात असमर्थ ठरत असल्याने बँकांनाही दंड लावण्याची मागणी तुळजापूरकर यांनी केली आहे.

Web Title: Cash shortage in ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.