दीड कोटी जनतेला कॅशलेस आरोग्य विमा
By admin | Published: August 19, 2016 12:45 AM2016-08-19T00:45:37+5:302016-08-19T00:45:37+5:30
राज्यातील ५ कोटी जनता अर्थिक दुर्बल घटकात येते. त्यातील दीड कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात १२०० आजारांसाठी कॅशलेस आरोग्य विमा दिला जाणार आहे. महात्मा फुले
पुणे : राज्यातील ५ कोटी जनता अर्थिक दुर्बल घटकात येते. त्यातील दीड कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात १२०० आजारांसाठी कॅशलेस आरोग्य विमा दिला जाणार आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ही सुविधा दिली जाईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात दिली. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अत्याधुनिक एम.आर.आय युनिटच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, रुग्णालयाचे विश्वस्त व ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर व रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.
राज्यातील ५०० रुग्णालयांची निवड करुन त्याठिकाणी कॅशलेस विमा सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. याचा लाभ घेता यावा यासाठी दीड कोटी जनतेला स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत. यामध्ये शेतकरी, दुर्बल घटकातील लोकांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्व रुग्णालयात धर्मादायसाठी विशिष्ट खाटा राखीव असतात. मात्र रुग्णालयांकडून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला जात नसल्याने राज्यात अनेक नामांकित रुग्णालयांवर फौजदारी खटला भरावा लागतो हे दुर्दैवी आहे. येत्या काळात डिजिटल इंटरफेसच्या साह्याने शहरांतील रुग्णालयांतील दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या राखीव जागांबाबतची माहिती वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जे.जे. रुग्णालयाला ५ खेडी जोडून त्याअंतर्गत टेलिमेडीसीनचा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला. येत्या काळात राज्यातील ग्रामीण भाग अशा पद्धतीने शहराला जोडण्याचा प्रयत्न करण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविकात डॉ. धनंजय केळकर यांनी मंगेशकर हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सेवेची माहिती देऊन २९ कोटीहून अधिक रकमेचे वैद्यकीय उपचार गरिबांवर केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान
- मुंबईमधील इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करताना कोणताच वाद नको आहे. त्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी चर्चा करून स्मारकाचे काम सुरू झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०१५-१६ वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.
- पुण्यातील सावळाराम वानखेडे, अशोकलाल शहा, अजय चांदणे, आप्पा मोहिते, देवीचंद जैन आणि स्वरूप वर्धिनी व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राकेश शर्मा यांना शौर्य पुरस्कार : थोरले बाजीराव पेशवे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर (निवृत्त) राकेश शर्मा यांना शौर्य पुरस्कार वितरीत करण्यात आला. उद्योगपती अभय फिरोदिया प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. शर्मा यांनी पुरस्कार स्विकारताच प्रेक्षागृहाने टाळ्यांच्या कडकडाट करीत उभे राहून त्यांना मानवंदना दिली.