‘कॅशलेस’ सेवा रेल्वेला फायदेशीर
By Admin | Published: January 12, 2017 06:43 AM2017-01-12T06:43:29+5:302017-01-12T06:43:29+5:30
नोटाबंदीनंतर लोकलचा पास काढण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली.
मुंबई : नोटाबंदीनंतर लोकलचा पास काढण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली. उपनगरीय लोकल स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करून पासाचे शुल्क भरण्यासाठी पीओएस मशिन बसवण्यात आल्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून १५ दिवसांत ९७ लाखांची कमाई झाली आहे.
रेल्वेने मेल-एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी स्थानकांवर टप्प्याटप्प्यात कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिन बसवण्यास सुरुवात केली. या मशिन बसवल्यानंतर लोकल प्रवाशांनाही पास काढण्यासाठी ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेवर ६२४ तर पश्चिम रेल्वेवर ३२४ मशिन बसवण्यात आल्या. २६ डिसेंबरपासून जरी ही सेवा सुरू करण्यात आली असली तरी त्याला २७ डिसेंबरपासून लोकल प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.
गेल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेवर ८ हजार १८५ प्रवाशांनी पास काढण्यासाठी पीओएस मशिनचा लाभ घेतला. तर पश्चिम रेल्वेवर २ हजार ९१८ प्रवाशांनी या मशिनचा वापर केल्याची माहिती मुंबईतील रेल्वेच्या क्रिस संस्थेचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. मध्य रेल्वेला जवळपास ६५ लाख २६ हजार तर पश्चिम रेल्वेला ३२ लाख १० हजारांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. (प्रतिनिधी)
स्वतंत्र खिडकीची मागणी
या सेवेचा पासधारकांना सोडून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मात्र थोडा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पासाचे पैसे भरावे लागत असल्याने त्या प्रक्रियेसाठी साधारपणे दोन ते तीन मिनिटांचा अवधी लागतो. कधी कधी नेटवर्कची समस्या उद्भवल्याने तो कालावधी वाढतो. त्यामुळे रांगेत तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मात्र ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे कॅशलेस सुविधेसाठी स्वतंत्र तिकीट खिडक्यांची मागणी प्रवाशांकडून होत आहे.