कॅशलेस व्यवहार ४० टक्क्यांनी घटले
By admin | Published: April 12, 2017 01:35 AM2017-04-12T01:35:07+5:302017-04-12T01:35:07+5:30
रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात
पुणे : रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्याने, नागरिकदेखील हातचे राखूनच ई पेमेंट करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्या वेळी रोकडरहित व्यवहार करण्यासाठी सरकारने आवाहन केले होते. मात्र, रोख रक्कमेची उपलब्धता वाढताच ई व्यवहारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू झाली आहे. नोटाबंदीच्या काळात तब्बल दोन ते अडीच महिने सरासरी ८० टक्के व्यवहार हे नेट बँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून होत होते. हे प्रमाण आता सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यातच विविध बँकांनी आपल्या व्यवहारांवर भरघोस शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्येक बँकांचे हे दर वेगवेगळे आहेत. हॉटेलिंग, पेट्रोल, कपडे अशा व्यवहारांनुसार दर आकारले जात आहेत. पट्रोलच्या प्रत्येक व्यवहारासाठी ६ ते १४ रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे नागरिकही व्यवहाराचा प्रकार आणि निकड या नुसार ई व्यवहारांना पसंती देत आहेत.
विविध बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जाचे दर जाहीर करतात. त्यासाठी विविध योजनाही असतात. याच बँकांनी ई व्यवहारांना चालना देण्यासाठी आम्ही किती
शुल्क आकारतो, हे मात्र जाहीर केले जात नाही. कोणत्या बँकेमध्ये दर्शनी भागात अशा शुल्काचे दरपत्रक लावल्याचे आढळून येत नसल्याचा खातेदारांचा अनुभव आहे.
सराफी व्यावसायिक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘सोन्या चांदीच्या खरेदीसाठी ३० टक्के व्यवहार
ई पेमेंट, धनादेश याद्वारे होतात. यात सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.’ मात्र, काही सराफी व्यावसायिकांनी १० टक्के व्यवहारही ई पेमेंटद्वारे होत नसल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)
नोटाबंदीच्या काळात ८० टक्क्यांपर्यंत विविध कार्डद्वारे पैसे अदा केले जायचे. मात्र, आता ३० टक्केच व्यवहार कार्डद्वारे होत आहेत. आता पुन्हा रोखीनेच व्यवहार होत आहेत. विविध बँका ८ ते १४ रुपयापर्यंत एका व्यवहारामागे शुल्क आकारात आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळत आहेत.
- बाबा धुमाळ, अध्यक्ष आॅल इंडिया पेट्रोल अँड डीलर्स असोसिएशन
कपडे खरेदीत पूर्वी ६५ टक्क्यांपर्यंत कार्डपेमेंट होते. त्यात आता ६५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कार्डपेमेंट वाढले असले, तरी नागरिक हातचे राखूनच खरेदी करताना दिसत आहेत.
- दिनेश जैन, कपडे व्यापारी