कॅशलेस प्रवासाबरोबर आता FASTag वर मिळणार ५ टक्के कॅशबॅक
By जयदीप दाभोळकर | Published: January 7, 2021 05:43 PM2021-01-07T17:43:04+5:302021-01-07T17:45:39+5:30
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) या टोलनाक्यांवरही घेता येणार लाभ
ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि वाहनांच्या लांब रांगा कमी करण्यासाठी केंद्रानं FASTag अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे FASTag प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के कॅशबॅक दिलं जाणार आहे. ११ जानेवारी २०२१ ही या नव्या योजनेला सुरुवात होणार आहे.
पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे. “ मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या ५ टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,” असे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातर्गंत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबई एन्ट्री पॉईंटतर्गंत वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. फास्टॅग प्रणालीच्या १०० टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
FASTag स्टॉललाही सुरुवात
फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या बँकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरु करण्यात आले आहेत.