गावांची जातीवाचक नाव रद्द होणार? ; राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:52 AM2020-02-12T10:52:36+5:302020-02-12T10:58:05+5:30
जातिवाचक नावांमुळे ग्रामीण भागात भेदाभेद आणि विषमता पसरते.
मुंबई : ग्रामीण भागातील अनेक गावांना त्या गावातील समाजाच्या किंवा जातीच्या नावाने नावे दिली गेली आहेत. त्यामुळे राज्यातील खेडेगावांना ठेवण्यात आलेली जातिवाचक नावं राज्य सरकार बदलण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे वृत्त टीव्ही 9 या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
राज्यातील वस्त्या, वाड्यांना जातींवरुन ठेवलेली नावं रद्द करण्यासाठी ठाकरे सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेतही दिले होते. तर दुपारी दोन वाजता मंत्रालयात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची चिन्हं आहेत.
जातिवाचक नावांमुळे ग्रामीण भागात भेदाभेद आणि विषमता पसरते. तसेच दोन समाजात यामुळे वाद ही होतात. त्यामुळे जातिवाचक नावे असलेल्या गावांची नावे बदलून त्यांची शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावं ठेवण्याचा विचार सरकार करत आहे.