सीमा भागातील विद्यार्थ्यांना कर्नाटकच्या सीईटीचे बंधन
By Admin | Published: March 8, 2016 02:41 AM2016-03-08T02:41:04+5:302016-03-08T02:41:04+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील विद्यार्थ्यांनी चालू वर्षासाठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी २०१६) देऊ नये़ त्याऐवजी कर्नाटक राज्याची सीईटी द्यावी
धर्मराज हल्लाळे, नांदेड
महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील विद्यार्थ्यांनी चालू वर्षासाठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी २०१६) देऊ नये़ त्याऐवजी कर्नाटक राज्याची सीईटी द्यावी, असा तुघलकी आदेश कर्नाटकच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिला आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे़
मेडिकल सीईटी ५ मे रोजी होत असून त्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी २२ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज भरू शकतात़ सीमा भागातील विद्यार्थ्यांनी कर्नाटक आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमाची सीईटी द्यावी, त्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील एमकेबी (महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड बॉर्डर) कोट्यातील आरक्षित जागांवर गुणवत्तेप्रमाणे प्रवेश दिला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिसूचनेत म्हटले आहे़ जवळपास ८६५ गावांतील मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे़ महाराष्ट्रात १२वी बोर्डाचा अभ्यासक्रम तर कर्नाटकमध्ये एनसीईआरटीचा ११वी व १२वी या दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम मेडिकल सीईटीसाठी आहे़ हा बदल विद्यार्थ्यांनी स्वीकारलाही असता, परंतु त्यांना पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही़ प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपलेली असताना कर्नाटकाची परीक्षा कशी द्यायची तसेच दोन महिन्यांवर परीक्षा आली असताना वेगळा अभ्यास कसा पूर्ण करायचा, असे अनेक प्रश्न सीमा भागातील विद्यार्थ्यांना पडले आहेत़
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सीमा भागातील विद्यार्थ्यांना कर्नाटकात जाऊन परीक्षा देण्याचा सल्ला दिला असून सर्वकाही १५ दिवसांत घडणार असल्याने विद्यार्थ्यांना न्यायालयाशिवाय पर्याय उरलेला नाही़