उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:59 AM2024-05-28T10:59:50+5:302024-05-28T11:00:25+5:30
Pune Porsche Accident Case Update: शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी या मुख्य डॉक्टरांवर गंभीर आरोप केलेले. झगडेंनी त्यावरच बोट ठेवले.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणात सरकारी यंत्रणेचे पितळ उघडे पडलेले आहे. पोलीस, आमदार, डॉक्टर या यंत्रणा कशा या बिल्डर पुत्राला सोडविण्यासाठी कामाला लागलेल्या याचे एकेक पुरावे समोर येत आहेत. बिल्डरच्या बाळाने दारु पिलेली नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेऊन त्याचे सॅम्पल कसे बदलले, कचऱ्यात टाकले. त्यांना हे करण्यासाठी कोणा कोणाचे फोन आले आदी गोष्टी अगदी चवीने चर्चेत येत आहेत. सुरुवातीला ज्या पोलिसांनी त्या बिल्डर बाळाला सोडविण्याचा प्रयत्न केला तेच पोलिस प्रशासन आता त्यांच्यावर लागलेला बट्टा पुसण्याच्या कामी लागले आहेत.
अशातच या ससूनच्या डॉक्टरांच्या चौकशीसाठी एक समिती बनविण्यात आली आहे. या समितीतील डॉक्टरांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यामुळे माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी या समितीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एका डॉक्टरच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यांनाच नेमल्याने झगडे यांनी उंदराला मांजर साक्ष अशी या समितीला उपमा देत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फेसबुकवर पोस्ट करत झगडे यांनी त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा, असा टोलाही सरकार व प्रशासनाला लगावला आहे.
पोर्श-ससून या गंभीर प्रकरणात अडकलेल्या डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर गंभीर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून "उंदराला मांजर साक्ष" ही म्हण पुनर्जिवित करण्याचा चंग तर विनोदी वरिष्ठांनी बांधलेला नाही ना? राज्यात या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा, अशा शब्दांत झगडे यांनी टोला लगावला आहे.
जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, मुंबईतील डॉक्टर गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सुधीर चौधरी ही समिती नेमण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी सापळेंवर गंभीर आरोप केले होते. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे मधील भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप आहेत. यावरून झगडेंनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.