सर्किट बेंचसाठी मुख्य न्यायाधीशांना साकडे
By admin | Published: February 7, 2016 01:05 AM2016-02-07T01:05:10+5:302016-02-07T01:05:10+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ लवकर व्हावे, अशी मागणी येथील वकिलांच्या शिष्टमंडळाने उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ लवकर व्हावे, अशी मागणी येथील वकिलांच्या शिष्टमंडळाने उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरमाणी यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी केली. यावर न्या. ताहिलरमाणी यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दरम्यान, रविवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या उद्घाटन समारंभाकडे वकील बांधव पाठ फिरविणार आहेत.
रविवारी होणाऱ्या इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. विजया ताहिलरमाणी यांच्यासह न्या. रणजित मोरे आणि न्या. महेश सोनक यांचे शनिवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. कोल्हापुरात सहा जिल्ह्यांसाठी प्रथम सर्किट बेंच स्थापन करावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य न्यायाधीशांची तेथे भेट घेतली.
या वेळी राजेंद्र चव्हाण यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ खंडपीठ प्रश्नासाठी लढा सुरू आहे. सर्किट बेंचबाबत राज्यातील तत्कालीन सरकारने खंडपीठ व्हावे, असा ठराव करून दिला होता. त्यामुळे आपण सर्किट बेंच होण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली.
शिष्टमंडळात अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. माणिक मुळीक, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. रवींद्र जानकर, अॅड. राजेंद्र किंकर, अॅड. धनंजय पठाडे, अॅड. बाळासाहेब पाटील आदींचा सहभाग होता.
बहिष्कार मागे घ्या
न्या. ताहिलरमाणी यांची भेट घेतल्यानंतर सर्व वकील बाहेर आले. त्या वेळी शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची अॅड. राजेंद्र चव्हाण यांच्यासह वकिलांनी भेट घेतली. त्या वेळी डॉ. सैनी व देशपांडे यांनी रविवारचा बहिष्कार मागे घ्या, अशी त्यांना विनंती केली. मात्र, त्यावर वकिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.