...सुवेग अन सुदृढ कामगिरीमुळे 'कॅट्स'ला 'प्रेसिडेंट कलर'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 09:59 AM2019-10-10T09:59:59+5:302019-10-10T10:00:06+5:30
भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध दलांच्या शौर्य व वैभवशाली अशा देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून तीनही दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान त्या संरक्षण दलाला प्रदान केला जातो.
नाशिक : भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध दलांच्या शौर्य व वैभवशाली अशा देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून तीनही दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान त्या संरक्षण दलाला प्रदान केला जातो. एका विशिष्ट प्रकारचा ध्वज सन्मानाने राष्ट्रपती त्या दलाच्या परेडची मानवंदना घेत प्रदान करतात. अशाच पध्दतीचा सर्वोच्च सन्मानाने नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’ला (कॅटस्) राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गौरविणार आहेत.
१९८६साली आर्मी एव्हिएशनची स्वतंत्र लष्करी हवाई दल म्हणून स्थापना करण्यात आली. युध्द व शांती काळात या एव्हिएशनच्या दलाने स्वत:ला उल्लेखनीय कामगिरीद्वारे सिध्द केले आहे. कारगिलचे युध्द असो की हिमालयातील सियाचीन, की मग राजस्थान अन् कच्छचा वाळवंटीप्रदेश अत्यंत कमालीच्या बिकट अशा नैसर्गिक वातावरणातदेखील एव्हिएशनने आपली भूमिका बजावली आहे. २९ सप्टेंबर रोजी रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गोपालपूरच्या हवाई दल केंद्राला ‘प्रेसिडेंट कलर’ने सन्मानित केले गेले. त्यानंतर गुरूवारी (दि.१०) गांधीनगरच्या ‘कॅटस्’ला हा सर्वोच्च बहुमान ते प्रदान करणार आहेत. नाशिकला कें द्र कार्यान्वित झाल्यापासून प्रशिक्षणार्थी जवनांना लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण कॅटस्च्या रन-वेवरून दिले जात आहे. लढाऊ वैमानिकांच्या अद्याप ३० तुकड्या देशसेवेत कॅ टस्मधून दाखल झाल्या आहेत. या कामगिरीची दखल घेत दस्तुरखुद्द सरसेनापती या केंद्राला सर्वोच्च सन्मान करण्यासाठी नाशिक मुक्कामी आले आहेत. यामुळे कॅटस्चे महत्त्व अधोरेखित होते. भारतीय सैन्याचा पाठीचा कणा म्हणून लष्करी हवाई दलाला ओळखले जाते.
...म्हणून दिला जातो ‘प्रेसिडेंट कलर’
वैभवशाली कामगिरीची परंपरा कायम राखली जावी व त्या दलाचे किंवा केंद्राचे मनोबल अधिकाधिक उंचावले जावे, यासाठी कामगिरीच्या इतिहासाचा गौरव म्हणून राष्टÑपतींकडून ‘प्रेसिडेंट कलर’ अर्थात एक विशिष्ट प्रकारचा ध्वज प्रदान करण्याची प्रथा आपल्या देशात स्वातंत्र्यानंतरही पाळली जाते. या प्रथेला तसा इंग्रज राजवटीचा इतिहासदेखील आहे. इंग्रजांनी रोमन साम्राज्याकडून ध्वज प्रदान करण्याची प्रथा अवलंबविली होती. भूदल, वायूदल, नौदल अश तीनही संरक्षण दलाशी संबंधित संस्था व केंद्रांना हा बहुमान त्यांच्या कामगिरीच्याअधारे दिला जातो.