मांजरी पूल गेला पाण्याखाली
By Admin | Published: August 4, 2016 12:57 AM2016-08-04T00:57:50+5:302016-08-04T00:57:50+5:30
दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली
मांजरी : दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पुणे परिसरात सतत पाऊस पडत असल्याने तसेच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, अखेर मांजरीतील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.
दिवसभर संततधार पाऊस व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने बुधवारी सायंकाळी मांजरी येथील मुळा - मुठा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. नदीला पूर आल्याने पाहणाऱ्यांंनी गर्दी केली होती. पुरामूळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे अधिकारी ए. एस. आय. वेताळ, पोलीस नाईक जी. बी. येळे, हवालदार संतोष कोलते, पोलीस पाटील अंकुश उंद्रे, तसेच मांजरी पोलीस चौकीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व मांजरी बुद्रुकचे पोलीस पाटील शिवाजी घुले यांनी दुर्घटना टळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
पुलापर्यंत पाणी पोहोचल्याने पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी पुलाच्या परिसरात गर्दी केली आहे.
(वार्ताहर)
मांजरी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, हडपसर, शेवाळेवाडी, केशवनगर, मुंढवा, लोणीकाळभोर, फुरसुंगी, कोलवडी, थेऊर, केसनंद, वाडेबोल्हाई, आव्हाळवाडी, वाघोली अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसाळ्यात दरवर्षी मांजरी येथील पूल पाण्याखाली जात असतो त्यामुळे पुलावरील सुरक्षारक्षक असणारे लोखंडी पाईप पावसाळ्याच्या कालावधीसाठी काढले जातात. व पुन्हा काही महिन्यांनी पाईप बसवले जातात. परंतु अशा कालावधीत वाहतूक चालकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे, कारण पुलावर पाणी वाढले तरी वाहनचालक पुलावरून पाण्यातून ये - जा करत होते. तसेच पुलाच्या कठड्याला जलपर्णी अडकून बसल्याने डासांचे प्रमाणही वाढले आहे त्यामूळे डेंग्यू, मलेरिया अशा आजारांपासून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाकङून सांगण्यात आले आहे.