पोटच्या पोरांनी हाकललं, स्मशानभूमीनं सांभाळलं
By admin | Published: March 10, 2016 12:57 AM2016-03-10T00:57:36+5:302016-03-10T00:57:36+5:30
पोटच्या पोरांनी घरातून हाकललं...चालता येत होतं तोपर्यंत मी पोराच्या घरी जायचो; पण फक्त आईच्या फोटोला पाया पडायला...आता पाय मोडल्यापासून तिथंही जाऊ शकत नाही. आता जगू वाटत नाही.
रविकिरण सासवडे, बारामती
बारामती : पोटच्या पोरांनी घरातून हाकललं...चालता येत होतं तोपर्यंत मी पोराच्या घरी जायचो; पण फक्त आईच्या फोटोला पाया पडायला...आता पाय मोडल्यापासून तिथंही जाऊ शकत नाही. आता जगू वाटत नाही.. आपल्या नशिबाला दोष द्यायचा दुसरं काय?... अशा शब्दांत उत्तरआयुष्यातील हालाखीची हृदयद्रावक व्यथा मांडली आहे. गुणवडी (ता. बारामती) येथील स्मशानभूमीचा आसरा घेतलेल्या वृद्ध दाम्पत्याने... पाणावलेले डोळे अन् थरथरणारे शब्द हालाखीचं जीणं मांडण्यासाठी पुरेसे होते.
जन्म दिलेल्या रक्ताच्या नात्यांनीच म्हातारपणी ओझे नको म्हणून वृद्ध माता-पित्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला. वृद्ध भागुजी आगवणे त्यांचा खुबा मोडल्याने जायबंदी अवस्थेत स्मशानभूमीलगत पडून आहेत. या अवस्थेत वृद्धत्वानेच खचलेली त्यांची पत्नी सुभद्रा आगवणे या त्यांना भीक मागून जगवत आहेत. त्यातही या दु:खात भरीस भर म्हणून सुभद्रा या मूकबधिर आहेत. हे दाम्पत्य मूळचे गुणवडीचे आहे. भागुजी यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुलांना त्यांनी शिक्षण देऊन जगण्यासाठी सक्षम केले. त्यापैकी एकजण गृहरक्षक दलात नोकरीला आहे, तर दुसरा मुलगा व्यसनाधीन आहे. दोघेही वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी टाळाटाळ करतात.
>> खाकी वर्दीतली माणुसकी
या दाम्पत्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन येथे पोहोचले. पोटच्या पोरांचा अमानुषपणा अनुभवल्यानंतर पोलिसांतील माणुसकी त्यांनी अनुभवली. पोलिसांनी स्वत:च परिसराची साफसफाई करून, त्यांना राहण्यासाठी जागा करून दिली. उजेडासाठी विजेचा दिवा लावून दिला, तर गावातील तरुणांनी या दाम्पत्याला आधार दिला आहे. येथील तरुण लहानपणापासून दाम्पत्याला ओळखतात.
‘नाना’ म्हणून भागुजी गावात प्रसिद्ध आहेत. या नाना-नानींची देखभाल तरुण करतात. पोटच्या मुलांनी नाकारल्यानंतर माणुसकीच्या नात्यातून गावातील तरुणांनी जोडलेले भावबंद गहिवर आणतात.
>>व्यसनी मुलाला
दिला चोप
भागुजी आगवणे यांचा धाकटा मुलगा व्यसनाधीन आहे. त्याने स्मशानभूमीत येऊन भागुजी यांच्याशी वाद घातला. शिवीगाळही केली. या वेळी गावातील तरुणांनी तिथे धाव घेतली. त्या व्यसनी मुलाला चोप दिला. असे पाणावल्या डोळ्यांनी भागुजी यांनी सांगितले.