सेनेचा विजय ठरणार युतीतील भांडणाचे निमित्त

By admin | Published: June 7, 2016 07:42 AM2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:42:18+5:30

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपाची साथ लाभल्याने रवींद्र फाटक विजयी झाले.

The cause of the fight in the alliance will be the victory of the army | सेनेचा विजय ठरणार युतीतील भांडणाचे निमित्त

सेनेचा विजय ठरणार युतीतील भांडणाचे निमित्त

Next

अजित मांडके,

ठाणे- विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपाची साथ लाभल्याने रवींद्र फाटक विजयी झाले. मंत्रालयापासून जळगावपर्यंत एकमेकांची धुणी धुणाऱ्या या सत्ताधारी पक्षांनी ठाण्यात एकजुटीचे दर्शन घडवले असले तरी येत्या महापालिका निवडणुकीत जागावाटपाच्या चर्चेकरिता जेव्हा हे पक्ष एकत्र बसतील, तेव्हा विधानसभा निवडणूक निकालाच्या आधारे भाजपाने आणि विधान परिषद निकालाच्या बळावर शिवसेनेने जागांचे दावे-प्रतिदावे केले, तर ही एकजूट टिकेल किंवा कसे, याची चिंता युतीच्या धुरिणांना लागली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी भाजपाच्या मदतीने राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा १५१ मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीत गेल्या २० वर्षांचे युतीमधील हे दोन पक्ष परस्परविरोधी लढल्याने स्थानिक निवडणुकीत भाजपाने विधानसभा निकालाच्या आधारे जागांची मागणी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये जागावाटपामुळे युती तुटली व परस्परांविरुद्ध शिवसेना-भाजपा लढले. शिवसेनेला सर्वाधिक ५३ जागा मिळाल्या. मात्र, भाजपाच्या नऊ नगरसेवकांची संख्या ४३ झाली. ठाणे पालिका निवडणुकीतही विधानसभा निकालाच्या आधारे भाजपा ४० जागांची मागणी करीत आहे. मागील वेळी त्यांना २० जागा सोडल्यावर केवळ ८ नगरसेवक विजयी झाले होते.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या फाटक यांना पाठिंबा देताना पालिका निवडणुकीतील जागावाटपाची तडजोड झालेली नाही. त्यामुळे जेव्हा दोन्ही पक्ष त्या चर्चेला बसतील, तेव्हा फाटक यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असल्याचा दावा केला जाईल, तर फाटक यांचा विजय शिवसेनेच्या व्यूहरचनेचा भाग असून ठाण्यावरील शिवसेनेची पकड मजबूत असल्याचा तो पुरावा असल्याचे शिवसेना सांगेल. त्यामुळे या निवडणुकीत दिसलेली एकजूट पालिका निवडणुकीपर्यंत टिकण्याची सुतराम शक्यता नसल्याचे युतीचे नेते खाजगीत कबूल करतात. एकनाथ खडसे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतल्यावर शिवसैनिकांनी जळगावमध्ये पेढे वाटून आनंद साजरा केला. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराचे मूळ हे साहेब, मेहुणा व पीए यांच्यापर्यंत जाते, असे वक्तव्य करीत थेट शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजपा-शिवसेना यांच्यात खडाखडी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील एकजुटीचे फेव्हिकॉल महापालिका निवडणुकीत निघून हे दोन पक्ष विलग होण्याची चिन्हे दाट आहेत.
>राष्ट्रवादीची उतरती कळा कायम
डावखरे यांच्या पराभवाचा फटका अगोदरच कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद महापालिका निवडणुकीत घटवणार, अशी चिन्हे दिसत आहेत. ठाण्याच्या राजकारणात वसंत डावखरे आणि जितेंद्र आव्हाड यांचे गट आहेत. डावखरे यांचा पराभव झाल्याने आता त्यांच्या गटाचे महापालिका निवडणूक जागावाटपात किती वर्चस्व राहणार, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे डावखरेसमर्थक नगरसेवक व इच्छुक आव्हाडांच्या वळचणीला जाण्यापेक्षा शिवसेना अथवा भाजपाकडे जाण्याचा पर्याय स्वीकारू शकतात. समजा, काही डावखरेसमर्थकांनी आव्हाड यांचे नेतृत्व स्वीकारायचे ठरवले, तरी मुंब्रा परिसरात एमआयएमचा शिरकाव झाल्याने आव्हाड यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान उभे राहिले आहे.शिवसेनेने मुस्लिमबहुल प्रभागात धनुष्यबाणाऐवजी अपक्ष चालण्याची भूमिका घेतली असल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद निवडणुकीत एमआयएमची मते शिवसेनेने आपल्याकडे वळवली असल्यास महापालिका निवडणुकीत शिवसेना आपल्या राजकीय लाभाकरिता एमआयएम चालवणार, हे उघड आहे. त्यामुळे आगामी काळात ठाण्यात राष्ट्रवादी वाढण्याऐवजी घटण्याची चिन्हे अधिक आहेत. डावखरे यांचा पराभव झाल्याने नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांचे वजन वाढणार असून तेदेखील ठाण्यात जोरदार शिरकाव करण्याची शक्यता आहे. त्यामुळे डावखरे यांचा पराभव राष्ट्रवादीतील कलह वाढवणारा आणि पक्षापुढील संकटे वाढवणारा ठरणार असल्याचे बोलले जाते.

Web Title: The cause of the fight in the alliance will be the victory of the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.