कावळोबांच्या साक्षिने बायकोंच्या विचारांचे ‘हवन’
By Admin | Published: March 7, 2017 09:25 PM2017-03-07T21:25:23+5:302017-03-07T21:25:23+5:30
पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित पतींसाठी उभारलेल्या ‘पत्नी पीडित पुरूष आश्रमा’ची भरणी आणि पुजन महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर हटके पद्धतीने करण्यात आले
सोमनाथ खताळ
औरंगाबाद, दि, 7 - पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित पतींसाठी उभारलेल्या ‘पत्नी पीडित पुरूष आश्रमा’ची भरणी आणि पुजन महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर हटके पद्धतीने करण्यात आले. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या पीडित पतींनी बायकोने दिलेल्या त्रासाचे वाचन आणि हवन केले. यावेळी कावळोंबांना प्रेरणास्थान व साक्ष म्हणून जवळ ठेवण्यात आले होते. आगळा-वेगळा हा सोहळा मंगळवारी बॉम्बे हायवेवर औरंगाबादपासून जवळच असलेल्या साजापुर येथे पार पडला.
मागील काही दिवसांपासून पत्नीच्या त्रासामुळे अनेक पतीराज त्रस्त आहेत. पोलीस केसेस, न्यायालयीन खेटे, मारहाण अशा अनेक प्रकारांमुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दिवसेंदिवस हे अन्याय वाढत चालल्याने पत्नीने १४७ दाखल केलेल्या औरंगाबादमधील भारत फुलारे यांनी पत्नी पीडित पुरूष आश्रम उभारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरूष दिनाचे औचित्य साधून १९ नोव्हेंबर रोजी या आश्रमाची स्थापना करण्यात आली. बांधकामही झाले.
परंतु या आश्रमाच्या पुजनासाठी त्यांना हवा होता एक चांगला मुहूर्त. महिलांपासूनच आपल्याला त्रास झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दिनाचे औचित्य साधुनच या आश्रमाचे पुजन करण्याचे ठरविले. मंगळवारी या आश्रमाचे पुजनही करण्यात आले. याठिकाणी होम (अग्नि असलेला) करण्यात आला. परंतु हा होममध्ये कसलाही धार्मिक विधी करण्यात आला नाही. राज्यासह परराज्यातून आलेल्या पीडित पतींनी बायकोने दिलेल्या त्रासाचे एका कागदावर लिखाण केले. ते कावळोबांचे आशिर्वाद घेऊन सर्वांसमोर वाचण्यात आले. त्यानंतर त्या चिठ्ठीला होममध्ये टाकण्यात आले. असा हा आगळा वेगळा कार्यक्रम मंगळवारी मोठ्या थाटात पार पडला. यावेळी आलेल्या सर्व पत्नी पीडितांसाठी भंडाऱ्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता. सर्वत्र रांगोळी आणि फुलांचे तोरण लावण्यात आले होते. त्यामुळे परिसर फुलून गेला होता.
शहरातून वाहन दिंडी
पुजनाच्या पूर्वी सकाळी दहा वाजता औरंगाबाद शहरातून वाहन दिंडी काढण्यात आली. यामध्ये शेकडो पत्नी पीडित सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात आणि दुचाकीच्या समोर वेगवेगळ्या मागण्या असलेले फलक लावण्यात आले होते. विशेष म्हणजे दिंडीच्या समोर तीन चाकी वाहनावर कावळ्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही का उभारली हे कोणाला समजत नसले, तरी ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कोणी विचार करीत होते, तर कोणी हसून पुढे जात होते. सीडको बसस्थानकापासून निघालेली ही दिंडी बाबा पेट्रोलपंप मार्गे आश्रमात पोहचली.
कावळोंबाना का मानले प्रेरणास्थान?
सर्वांनाच प्रश्न पडला होता, की कावळोंबाची प्रतिकृती आणि प्रतीमा प्रत्येक ठिकाणी का लावली असेल. तर यावर अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले, मादी कावळा अंडे देते, आणि निघून जाते. त्यानंतर सर्व जबाबदारी ही नर कावळ्यावर येते. मादी कावळ्याला कसलीही काळजी नसते. पण तरीही कावळा डगमगत नाही. अशीच काहीशी परिस्थिती पत्नी पीडितांची आहे. त्यामुळे कावळ्याला प्रेरणास्थान मानून प्रत्येक कार्य आणि कार्यक्रम करतो.
काय आहेत मागण्या?
स्त्री-पुरूष समान कायद्याची पुरूषांसाठीही अंमलबजावणी करा, पत्नी पीडित पुरूषांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करा, मुलांना ढाल बनवून न्यायालयात वापर करणाऱ्या स्त्रियांवर कारवाई करा, स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही पोटगी लागू करा, महिलांप्रमाणे पुरूषांनाही न्यायालयीन फिस माफ करा, अशा विविध मागण्यांचे फलक यावेळी रॅलीत हाती घेण्यात आले होते.