अंबाजोगाई येथील लेणी दुलर्क्षित

By admin | Published: November 2, 2016 12:48 PM2016-11-02T12:48:07+5:302016-11-02T12:52:37+5:30

मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे.

The caves at Ambajogai are overlooked | अंबाजोगाई येथील लेणी दुलर्क्षित

अंबाजोगाई येथील लेणी दुलर्क्षित

Next

महेश चेमटे, ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २ -  मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. भौगोलिक परिस्थितीने सुसज्ज असल्याने इतिहासात सातवाहन, चालूक्य, यादव, बहामनी, राष्ट्रकूट घराण्यांचे अंबाजोगाई आणि पर्यायाने बीडमध्ये प्रस्थ होते. राष्ट्रकूट काळात कर्नाटक, आंध्रप्रदेशात व्यापारासाठी अंबाजोगाई शहराचा वापर होत असे. याच्या खुणा येथील डोंगरात लेण्यांच्या रुपात पाहायला मिळतात. मात्र या लेण्यांची माहिती वा नोंद देखील राज्य पुरातत्व विभागाकडे नसल्याची धक्कादायक माहिती सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.अनिता राणे-कोठारे यांनी दिली.
अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सीमेजवळील जयंती नदीच्या काठी तीन लेणी सापडतात. त्यात २ शैव आणि एक जैन प्रकाराच्या लेणी आहेत. त्यातील शैव लेणी ही लेणी ‘हत्तीखाना’ म्हणून ओळखला जातो. बहामनी काळात हत्ती पाणी पिण्यासाठी या जागेचा वापर करत असे. पर्वताच्या उतारावरील ही लेणी पाहता पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांची आठवण येते. तीन लेण्यांपैकी एक शैव लेणी काळाच्या पडद्याआड गेली असून; एक जैन आणि एक शैव लेणी तुर्तास तरी पाहण्याजोगे असल्याचे कोठारी यांनी सांगितले.
शैव लेणीमध्ये सभामंडप, एका कातळात कोरलेला नंदी मंडप दिसून येतो. गर्भगृहाबरोबर वास्तव्य करण्यासाठी ३ खोल्या देखील आहेत. चार ओळींमध्ये आठ खांबावर (३२ खांब) लेण्यांचा भार आहे. लेण्यांसमोरील मोकळ्या जागेत मोठ्या पाषणातील चार हत्ती आहेत. चार ही बाजूने प्रवेश करता येण्याजोगे नंदीमंडप येथील आकर्षण ठरते. शेजारील तुटलेला ध्वजस्तंभ गतवैभवाची आठवण करुन देतो. सप्तमात्रिका, तांडव करणारा शिव, महिषासूरमर्दिनी, भैरव, वामन अवतार, त्रिविक्रम, नरसिंह आणि शेषशाही विष्णू यांची शिल्पे पाहताना एलोरा येथील शिल्पांची जाणीव होते. वास्तू दुलर्क्षित असल्याने शिल्पांना मोकळ्या श्वासाची गरज असल्याचे मत कोठारी यांनी व्यक्त केले.


जैन धर्माच्या इतिहासाची ओळख करुन देणारी लेणी येथे दिसून येते. लेण्यांच्या तीन बाजूस मोकळ्या जागेत मोठे मंडप आहेत. मंडपात पूजा करण्यासाठी जैन तीर्थंकरांची कोरलेली शिल्पे आहेत. मंडपात काळ्या पाषाणात एकाच लांबीचे दोन कोरलेले हत्ती आहेत. त्यांपैकी एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने वा अनुदान न मिळाल्याने ती अपूर्ण राहिल्याचे मत लेणी अभ्यासकार आणि जाणकार नोंदवतात. लेण्यांच्या उजव्या बाजूला तीर्थंकर तर डाव्या बाजूला पार्श्वनाथ यांचे भग्नावशेष दिसून येतात. जयंती नदीच्या पुरामुळे यांची हानी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मंडपात १३ जैन तीर्थंकर, पार्श्वनाथ यांची बैठी प्रतिकृती, उभे तीर्थंकर लेण्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्याच बरोबर काताळात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केल्याचे दिसते. किंबहूना राष्ट्रकुट काळातील व्यापार व्यवस्थेचे चित्रण काताळात रेखाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. शिवाय चौमुख, चौरी घेतलेल्या स्त्रीचे शिल्प, हार घेतलेल्या विद्याधराचे शिल्प, शिरविरहीत स्त्रीची शिल्पेदेखील आहेत. घोड्यावरील पुरुषांसह विषम संख्येतील स्त्री-पुरुष व्यापार करत असल्याचे तर्क जाणकार लावतात. लातूरमध्ये या लेण्याची साधर्म्य असणारी ‘खरोसा’ची लेणी आहे, असे कोठारी यांनी सांगितले.

Web Title: The caves at Ambajogai are overlooked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.