कुर्डूगडावर लेणी सापडल्या
By admin | Published: June 15, 2015 02:07 AM2015-06-15T02:07:58+5:302015-06-15T02:07:58+5:30
माणगाव तालुक्यातील कुर्डूगडावर पुरातन लेणीत १०व्या ते १३व्या शतकातील वास्तूंचा शोध महाड येथील इतिहास संशोधक मंडळाचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रा. अंजय धनावडे
अलिबाग : माणगाव तालुक्यातील कुर्डूगडावर पुरातन लेणीत १०व्या ते १३व्या शतकातील वास्तूंचा शोध महाड येथील इतिहास संशोधक मंडळाचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रा. अंजय धनावडे व महाड येथील सह्याद्री मित्र या गिर्यारोहक संस्थेच्या एका मोहिमेत लागला. प्राथमिक पाहणीनुसार त्यांचा कालावधी हा शिलाहारकालीन असावा, असा त्यांचा निष्कर्ष आहे. या निष्कर्षाला ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी पुष्टी दिली आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील रायगड व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील देवघाट लिंग्या घाट पसिरातील काळ नदीच्या उगमावर असलेल्या कुर्डूगडावर म्हणजेच विश्रामगडावर या झालेल्या संशोधनात या लेणींमध्ये वास्तूंचा पहिला भाग अंदाजे २६ फूट लांब व सहा फूट रुंद असून, त्यात फेब्रुवारी-मार्चपर्यंत पाणी असते. दुसऱ्या भागात इंग्रजी ‘एल’ आकाराचे दालन असून ते पाण्याने भरलेले आहे. सुमारे २३ फूट लांब व १० फूट रु ंद आहे व ३.५ फूट खोल आहे. याला भग्नावस्थेतील कातळ कोरीव प्रवेशद्वार आहे. आतमध्ये कातळात खोदलेल्या खोबण्या आहेत. लाकडी फे्रमवर्कसाठी यांचा वापर झाल्याची शक्यता आहे.
याच्यापुढे कड्याला चिकटून थोडे उजवीकडे गेल्यानंतर आणखी एक वास्तू असून, ती सुमारे ६.५ फूट लांब व पाच फूट रुंद आहे.
त्याच्या खाली ‘खांब टाक’ आहे. ते साधारण १४ फूट लांब़ त्यात दोन खांब आहेत. या टाक्यांच्या पुढे एक कोरडं टाकं आहे. ते १४ फूट लांब १० फूट रुंद व सात फूट खोल असून यात गाळ आहे.
इतिहास संशोधक अंजय धनावडे यांनी गिर्यारोहक डॉ. राहुल वारंगे, अॅड. प्रशांत भुतकर, समृद्धी भुतकर, रूपेश वनारसे, चिंतन वैष्णव, भूषण शेठ, अमित गुरव, ओंकार माने यांच्या व स्थानिक ग्रामस्थ सांबरे, प्राथमिक शिक्षक ठिगळे यांच्या सहकार्याने या वास्तूंचा शोध घेतला. एक खांब टाके, निवासासाठी असणारी दोन लेणी आणि एक कोरडं टाकं अशा चार वास्तूंचा यामध्ये समावेश आहे. याच परिसरात लिंग्या घाटजवळ असलेल्या डोंगरमाथ्यावर चवऱ्या येथे चौकोनी आकाराच्या मुख असलेल्या पाण्याच्या टाक्या बाराव्या शतकातील असल्याचे धनावडे यांनी सांगितले. या मोहिमेची सुरुवात मे महिन्यात १७ तारखेला करण्यात आली होती.