दहीहंडीवर कोट्यवधींची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 01:27 AM2016-08-26T01:27:21+5:302016-08-26T01:27:21+5:30
दहीहंडीकडे मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी आयोजक नेत्यांची धावपळ आणि त्यातून झालेला कोट्यवधींचा खर्च याची चर्चा शहरात होती.
पिंपरी : महापालिकेच्या जवळ आलेल्या निवडणुका, सेलिबे्रटींना आणण्यासाठी मंडळांची चढाओढ, तसेच विभागातील नागरिकांना दहीहंडीकडे मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी आयोजक नेत्यांची धावपळ आणि त्यातून झालेला कोट्यवधींचा खर्च याची चर्चा शहरात होती. गेल्या वर्षी दुष्काळामुळे अनेक दहीहंडी उत्सव मंडळांनी उत्सव साजरा केला नव्हता़ यंदा मात्र मंडळांनी आठ दिवसांपासून सेलिबे्रटी, डीजे, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन उद्योगनगरीच्या राजकारणी मंडळींनी शहरात भरगच्च कार्यक्रम ठेवले होते़
दहीहंडीची चर्चा झाली पाहिजे यासाठी कितीही पैसे खर्च झाले तरी चालेल यासाठी पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सूचना देऊन पैशांची तजवीज केली होती़ नावाजलेला डीजे, प्रसिद्ध हिंदी आणि मराठी अभिनेत्री, दहीहंडी फ ोडण्यासाठी ठेवलेली बक्षीसाची मोठी रक्कम, दहीहंडी लावण्यासाठी उभी केलेली क्रेनचे भाडे, कार्यकर्त्यांचा खर्च, जाहिरात, बॅनर यामुळे एका दहीहंडीसाठी लाखोंची उधळण मंडळाच्यावतीने करण्यात आले़ विशेष म्हणजे सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला आपल्याच कार्यक्रमासाठी थोडावेळ आणण्यासाठी अनेक मंडळांनी लाखोंची बोली लावली होती़
शहरात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव आयोजित केले होते़ त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांसह अनेकांना फ ायदा झाला़ शहरात सर्वाधिक चर्चा होण्यासाठी लाखो रूपये भाडे देऊन डीजे मागविण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती़ दहीहंडी उत्सवासाठी मंडळांनी वर्गणीही चांगल्या प्रकारे जमा केली होती. सक्तीने वर्गणी मागण्याच्या घटना शहरात घडल्या. पोलिसांकडे अशा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हेही दाखल झाले. लाखो रूपये खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्यामध्ये दहीहंडीमंडळांनी सहभाग द्यावा़ तसेच त्यांनी नागरिकांना मदत केल्यास सत्कारणी लागेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती़