सीबीआयच्या आरोपपत्रामुळे योग्य ते समोर येईल- हमीद दाभोळकर
By admin | Published: September 7, 2016 05:27 PM2016-09-07T17:27:14+5:302016-09-07T17:28:38+5:30
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना विचारले असता ते म्हणाले, सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - बुधवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना विचारले असता ते म्हणाले, सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे.
याबरोबरच सारंग अकोलकर आणि विनय पवार हेही या कटामधील प्रमुख आरोपी असल्याचे सांगितले होते. मात्र आता याचे पुरावेही सीबीआयच्या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला तोंडी सांगण्यात आले आहे. अजून चार्जशीट हाती पडलेली नसून ती हाती आल्यावर जास्त योग्यरितीने यावर भाष्य करता येईल. परंतु सारंग अकोलकर आणि विनय पवार हे या प्रकरणातील प्रमुख संशयित असतील तर त्यांचा शोध तातडीने घेण्याची आवश्यकता आहे. हे दोघेही २००९ पासून फरार असून, जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत यासारखे आणखी गुन्हे होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि सीबीआय या दोन सर्वोच्च तपास यंत्रणा असून त्यांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. याबरोबर कलबुर्गी आणि पानसरे या दोघांच्याही खुनाचा या सर्व गोष्टींशी काय संबंध आहे याचीही कसून चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे.
ते पुढे म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडा अशी मागणी आम्ही सुरुवातीपासूनच करत होतो. तसे न झाल्यास येत्या काळात आणखी हत्या होतील असेही आम्ही वारंवार सांगत होतो. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले न गेल्याने कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या. मात्र या खूनेकऱ्यांना पकडा आणि त्यांना शिक्षा द्या अशीच आमची मागणी आहे. या सगळ्या प्रकरणात सनातन संस्था किंवा हिंदू जनजागरण समिती काय म्हणते याबाबत आम्हाला काही घेणे देणे नाही. सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशीटमुळे सगळ्या गोष्टी उघड झाल्या आहेत.