‘सीबीआय, सीआयडीने एकत्रित तपास करावा’
By admin | Published: March 18, 2017 02:42 AM2017-03-18T02:42:28+5:302017-03-18T02:42:28+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी प्रामाणिकपणे व एकत्रितपणे तपास करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआय व सीआयडीला केली.
- दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी प्रामाणिकपणे व एकत्रितपणे तपास करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआय व सीआयडीला केली.
दोन्ही तपास यंत्रणांनी शुक्रवारी न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे तपास अहवाल सादर केला. हा अहवाल वाचत खंडपीठाने म्हटले की, तपास यंत्रणांनी आरोपींना पकडण्यासाठी मेहनत घेतली आहे. या दोन्ही केसमधील आरोपी सारखेच आहेत. हे सर्व आरोपी उजव्या जहालवादी गटाचे आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी दोन्ही तपास यंत्रणांनी एकत्रित व प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले. ‘पुढील तपासामध्ये दोन्ही तपास यंत्रणा एकत्रित काम करतील, असे आमचे मत आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही तपास यंत्रणा कसून तपास करतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे. या तपासातून भविष्यात काहीतरी भक्कम (पुरावे) बाहेर यावे, अशी आम्ही अपेक्षा करतो. तपास करताना काळजीपूर्वक करा. फरार आरोपींना मदत होईल, अशी कोणतीही चूक करू नका,’ असे खंडपीठाने तपास यंत्रणांना सावध करताना म्हटले. (प्रतिनिधी)