कर्जघोटाळ्याची सीबीआय चौकशी करा
By admin | Published: July 8, 2017 04:20 AM2017-07-08T04:20:28+5:302017-07-08T04:20:28+5:30
गंगाखेड (जि.परभणी) तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा़ लि़ या साखरचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि संचालक मंडळाने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गंगाखेड (जि.परभणी) तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा़ लि़ या साखरचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि संचालक मंडळाने बँकांच्या मदतीने केलेला कर्ज घोटाळा ६५० कोटींहून अधिक असून शेकडो शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
‘गंगाखेड शुगर्स’च्या अध्यक्ष व संचालकांनी शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून व बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन शेतकऱ्यांच्या नावे परस्पर ३२८ कोटींचे कर्ज लाटले. मात्र बोगस कर्जाचा आकडा ६५० कोटींहून अधिक आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणी करणार असल्याचे मुंडे म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत उडालेला गोंधळ तसेच परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्याने झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यपालांना आदेश द्यावे लागल्याची घटना ताजी असताना विद्यापीठाने १११ कोटींच्या ठेवी मुदतपूर्व काढण्यात आल्याची माहीती समोर आली आहे.
यातून विद्यापीठाचा बेजबाबदार, नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याची जबाबदारी सर्वस्वी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची असल्याने राज्यपालांनी त्यांना तात्काळ पदावरुन दूर करावे, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.